बोटीतून प्रवास करताना लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक करणाऱ्या नियमांची फेरी (बोट) चालकांकडून अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे आता अधिकाऱ्यांना जाग आली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटून भीषण अपघात झाला. यात १०० हून अधिक प्रवासी होते. १३ जणांना आपला जीव गमवावा लागला.
गेटवे ऑफ इंडिया येथे नियुक्त केलेले सहायक बोट निरीक्षक देविदास जाधव यांनी पीटीआयला सांगितले की, मांडवा, एलिफंटा येथे फेरी मारणाऱ्यांसाठी किंवा बंदरातून प्रवासासाठी लाइफ जॅकेट वापरणे अनिवार्य केले आहे. कामानिमित्त मांडवा येथे प्रवास करणाऱ्या संगीता दळवी या प्रवाशाने सांगितले की, लाईफ जॅकेटचा वापर आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वाचवू शकतो. तर, बोट मालक समीर बामणे म्हणाले की, प्रवासी अनेकदा उष्णता आणि आर्द्रतेमुळे लाईफ जॅकेट घालण्यास नाराजी व्यक्त करतात.
गुरुवारी, फेरीत चढण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रवाशांनी रांगा लावल्या होत्या. बहुतेक लोक हे शहराबाहेरचे होते आणि त्यांना बहुदा अपघाताविषयी कल्पना नव्हती. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पती कासिमसोबत आलेल्या शूरा बानू म्हणाल्या की, “आम्ही बोट पलटी झाल्याचे ऐकले नाही आणि फेरीच्या प्रवासाची वाट पाहत आहोत.” कोलकाता जवळील नादिया येथील रुद्रसेन दासगुप्ता यांनी सांगितले की, त्यांनी बोट उलटल्याचे व्हिडिओ पाहिले आहेत परंतु ते प्रवास करण्यास उत्सुक होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही शनिवारी परतत आहोत आणि कदाचित पुन्हा मुंबईला भेट देणे होणार नाही.
हे ही वाचा :
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!
कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून गरळ ओकत देशमुख कुटुंबाला मारहाण; प्रकरण काय?
अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य
राहुल गांधींवर शारीरिक इजा पोहोचवल्याचा आरोप
माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर म्हणाले की, “गेटवे ऑफ इंडियावर गर्दी व्यवस्थापन ही समस्या असते, विशेषतः शनिवार आणि रविवारच्या दिवशी जेव्हा लोकांची संख्या या परिसरात जास्त असते. गेटवे ऑफ इंडिया जेट्टीवरून एक नियमित प्रवासी म्हणून, मला काळजी वाटते की शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी प्रवासी बोटींची विशेष गर्दी असते. प्रवाशांची क्षमता किंवा त्यात बसणाऱ्यांची संख्या यावर कोणतेही नियम नाहीत. सुरक्षा उपकरणांशी तडजोड केली जाते. अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे,” असे नर्वेकर म्हणाले.