“मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतं. माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांत व्यक्तिगत मला आणि माझ्या कुटुंबाला ज्याप्रकारे लक्ष्य करण्यात आले तो म्हणजे रेकॉर्ड असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहा- सात लोक फक्त माझ्यावर बोलायचे. पण त्यांचे आभार, ते माझ्यावर बोलत राहिल्यामुळे लोकांच्या मनात माझ्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. जनतेने पाच वर्षांचे माझे काम बघितले होते. जात, धर्माचा विचार न करता सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय असे काम मी केले होते,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
“मी म्हटलं होतं, मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतं. माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे. याचं श्रेय माझं नाही, माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.
हे ही वाचा :
अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!
आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी
स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…
कुणीच लाईफ जॅकेट वापरले नाहीत, म्हणून…
‘एक है तो सेफ है’ला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. जनतेने महायुतीला घवघवीत यश मिळवून दिले. विरोधकांच्या मनात पाप आहे, जनतेच्या मनात नाही. खुल्या मनाने जनादेश स्वीकारा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले. विरोधकांनी निवडणूक जिंकण्यासाठी व्होट जिहादचा नारा दिला होता. पण, ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान एकाही पक्षाने स्वीकारले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. पुढे ते असेही म्हणाले की, तुम्ही जोपर्यंत आत्मपरिक्षण करत नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील. आम्ही लोकसभेत हरलो पण आम्ही ईव्हीएमवर खापर फोडलं नाही. फेक नरेटिव्हमुळे आम्ही हरलो. आता थेट नरेटीव्हने आम्ही उत्तर देऊ असं सांगितलं आणि आम्ही मेहनत केली.