भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपती निवड करण्यात आली आहे. आज (१९ डिसेंबर) पासून त्यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा नुकताच मंत्री मंडळ विस्तार झाला. यामध्ये ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याच दरम्यान, भाजपच्या राम शिंदे यांना मोठी जबाबदारी देत त्यांची विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड करण्यात आली आहे.
राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचे लक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त होते. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. राम शिंदे यांनी काल विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. राम शिंदे यांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री फडणवीसही सोबत होते. अखेर आज त्यांची बिनविरोध निवड झाली आणि पदभार स्वीकारला.
हे ही वाचा :
आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी
स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…
कुणीच लाईफ जॅकेट वापरले नाहीत, म्हणून…
प्रवासी बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. मात्र, राम शिंदे यांना ही संधी मिळाली. दरम्यान, राम शिंदे यांनी पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राम शिंदे यांची सभापती पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, राम शिंदे हे सर आहेत, त्यामुळे क्लास कसा चालवायचा हे त्यांना माहिती आहे. राम शिंदे शिस्तीने आणि संवेदनशील पद्धतीने सभागृह चालवतील याची आम्हाला जाणीव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.