मंत्रिमंडळाच्या विस्ताराला होणाऱ्या विलंबावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर तीर चालवले. शिवसेनेचे नाराज आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा केला. काही तासांत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले. आज राष्ट्रवादी शपचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याची चर्चा होती. सध्या राज्यातील नेत्यांच्या गाठीभेटीचा सिलसिला पाहिला तर लक्षात येते की, या भेटीत काँग्रेस कुठेच नाही. ते कोणाच्या संपर्कात असल्याची चर्चाही होताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते चिंतित आहेत. विरोधी बाकांवर बसलेले सत्तेच्या जवळ येण्यासाठी धडपडतायत आणि दावा करतायत सत्ताधारी आमदार आपल्या संपर्कात आहेत. राजकारणात खरे दावे करणे सक्तीचे नाही, परंतु ते किमान विनोदी होऊ नयेत असा प्रयत्न असावा.
नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीयमवर २१ ते २३ फेब्रुवारी असे तीन दिवस होणाऱ्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद शरद पवार भूषविणार आहेत. याच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रात माजी बेस्ट मुख्यमंत्री, विचारी आणि संयमी नेते उद्धव ठाकरे यांनी काल फडणवीसांची भेट घेतली. त्याच्या काही तास आधी त्यांनी शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आपल्या नियमित संपर्कात असतात असा दावाही केला होता. राजकारणात सगळ्या कसरती सत्तेसाठी सुरू असतात. नेत्यांचे संपर्कही सत्तेत येण्यासाठी किमानपक्षी सत्तेची उब मिळवण्यासाठी सुरू असतात.
गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी केंद्रातील सत्तेच्या सर्वोच्च सोपानावर विराजमान आहे. याच काळात शरद पवार विरोधी कँपमध्ये राहिले आहेत. परंतु त्यांनी मोदींचा संपर्क कायम राखला. कधी साखरेच्या मुद्द्यावर, कधी शेतकऱ्यांच्या कधी, सहकाराच्या. आज ते साहित्यासाठी मोदींची गाठभेट घेणार आहेत. त्यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देणार आहेत. थंडी म्हणजे उष्णतेचा अभाव. ही उष्णता आणि ऊर्जा राजकारण्यांना फक्त सत्तेच्या उबेतून मिळते. या उबेअभावी कुडकुडून आपला बर्फ गोळा होऊ नये म्हणून राजकारण्यांची धडपड सुरू असते. थंडीच्या काळात तुम्ही शेकोटी पेटवू शकत नसाल तर किमान दुसऱ्याने पेटवलेल्या शेकोटीवर काही मिनिटे हात तरी शेकू शकता. अर्थात जर शेकोटी पेटवणाऱ्याने परवानगी दिली तर. शरद पवार कायम मोदींच्या संपर्कात राहण्याचे कारण हेच आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे दावे विनोदी वाटतात.
हे ही वाचा:
दहशदवाद्याच्या अंतयात्रेला हजारो मुस्लिमांची उपस्थिती
काँग्रेसची इकोसिस्टीम कुजलेली आणि सडकी
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये सापडले शिवमंदिर; काय आहे इतिहास?
११ वीच्या प्रवेशासाठी गैरप्रकार करणारे होते कॉलेजमधील लिपिक
कालपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, भाषणांच्या आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अनर्गल टीका करणारे फडणवीसांच्या शपथविधीला निमंत्रण असूनही न जाणारे उद्धव ठाकरे अचानक त्यांची गाठभेट घेण्याइतपत सुसंस्कृत का झाले, असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. या भेटीनंतर आज त्यांनी पुन्हा सामना फडणवीसांवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून टीका केली. अमित शहा यांच्या विधानाचे निमित्त करून पत्रकार परिषदेतही भाजपावर शरसंधान केले. म्हणजे पुन्हा ठाकरेंनी दुतोंडी भूमिका स्वीकारलेली आहे.
ठाकरे काल फडणवीसांना का भेटले याचे कारण फार गूढ नाही. महायुती सरकारने मंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी कऱण्यासाठी एसआयटीची स्थापना केलेली आहे. भाजपाने नेते नितेश राणे यांनीही दिशा सालियान आणि सुशांत सिंहचे प्रकरण लावून धरले होते. मविआ सरकारच्या काळात परिवहन मंत्रालयात झालेला बदली घोटाळा, एंटालिया प्रकरण, सचिन वाझे, अशी अनेक प्रकरणं बुडाशी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा पारा फार वाढण्याआधीच एकदा फडणवीसांना जाऊन सलाम ठोकून यावा असा विचार या भेटी मागे आहे. बंद दाराआड लोटांगण आणि बाहेर रणांगण असा हा नवा पवित्रा आहे. थोडक्यात विरोधाचा आव आणला तरी सत्तेच्या सावलीची त्यांनाही गरज आहेच.
प्रश्न हा निर्माण होतो की त्यांना जर अधेमधे सत्तेच्या उबेची गरज वाटत असेल तर जे आमदार आधीच त्या उबेचा आनंद घेतायत ते तुमच्याकडे का येतील? आणि तुमच्याशी संपर्क का करतील? नाराज असले तरी ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकदा कृपाकटाक्ष टाकला तरी त्यांचे भले होईल. हात रिकामे असलेल्या ठाकरेंकडे जाऊन त्यांना काय मिळणार ? असेही ठाकरे घेण्यासाठी ओळखले जातात. देणे हा त्यांचा स्वभाव नाही. शिवसेनेने ठाकरेंना तात्काळ आव्हान दिले की हिंमत असेल तर नावे जाहीर करा. ठाकरे ती करू शकत नाहीत.
तानाजी सावंत, विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे. ही सगळी नाराजी छुपी नाही. त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. हे सगळे खरे असले तरी नाराज तुमच्याकडे येतील कशाला? उलट तुमच्याकडे असलेले २० आमदार फडणवीस-शिंदेंकडे डोळे लावून बसलेले आहेत. कधी दोन तृतीयांशचा आकडा पूर्ण होतो आणि कधी आम्ही तिथे उडी मारतो, या तयारीत आहेत. कारण तिथे सत्तेची उब आहे. ठाकरेंच्या सोबत येऊन काय मिळणार आहे. ते मुख्यमंत्री पद गमावल्यापासून बोलतायत की, ‘माझे हात रिकामे आहेत, माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काहीच नाही’. मग रिकामे हात धरायला शिंदेच्या आमदारांना वेड लागलंय की काय?
शरद पवार धूर्त असल्यामुळे पराभवानंतर शांत आहेत. मारकडवाडीच्या नावाने दोन दिवस ओरडा केला, चर्चा घडवली. वस्तादाचा नवा डाव, अशी वातावरण निर्मिती केली आणि थांबले. भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पवारांना बोलण्याची संधी होती. भुजबळ आणि अन्य काही आमदार संपर्कात आहेत, अशी बतावणी करण्याची. परंतु ते करणार नाहीत. त्यांना माहिती आहे, संपर्क फक्त सत्तेच्या उबेसाठीच साधला जातो. ती उब सध्या आपल्याकडे नाही. किंबहुना आपणच त्या उबेच्या शोधात आहोत. काँग्रेसचे नेते मात्र या गाठीभेटी शांतपणे पाहातायत. ते उघडपणे ना फडणवीसांना भेटत ना, मोदींना. नाना पटोले यांना फडणवीसांना भेटण्याची गरजच नाही. दोघांची मैत्री एकदम घट्ट आहे. न बोलता कार्यभाग साधण्याची कला त्यांच्याकडे आहे. काही लोक न बोलता करून घेतात, काही बोलून घालवतात. वायफळ बडबड करून सत्ता गमावली तरी तोंडाला आवर घालणे ठाकरेंना शक्य होताना दिसत नाही. परमेश्वर त्यांचे भले करो.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)