उत्तर प्रदेशमधील संभल येथील मंदिराच्या मागे असलेल्या घराचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवले जात आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी पथक दाखल झाल्याची माहिती ‘आज तक’ने दिली आहे. या घरांचे बेकायदा उभारलेले भाग पाडले जात असून घरांच्या विस्तारित बाल्कनीही पाडल्या जात आहेत. मंदिराशेजारी बेकायदा बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे आता ते पाडले असल्याचे जमीनमालक मतीन यांनी सांगितले. त्यांच्याकडे याचा नकाशा नसल्याने त्यांनी हे अनधिकृत बांधकाम तोडल्याचे म्हटले आहे.
एएसपींनी सांगितले होते की, जमीन मालकाने स्वतः अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे. संभल मंदिरामागील बेकायदेशीर अतिक्रमण असल्याचे लक्षात येताच जमीनमालक मतीन यांनीही सांगितले की, बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही. घराचा जो काही भाग जास्तीचा असेल तर तो काढला जाईल. आम्ही मुलांपेक्षा मंदिराची जास्त काळजी घेतली आहे.
संभल भागात वीजचोरी रोखण्यासाठी आलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाला १९७८ पासून बंद असलेले मंदिर निदर्शनास आले. यानंतर या मंदिरात विधी आणि मंत्रोच्चार करून पूजा आरती करण्यात आली. हे कार्तिक महादेवाचे मंदिर असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेनसिया यांनी दिली. येथे एक विहीर सापडली आहे. या विहिरीतून काही मूर्ती सापडल्या आहेत. मंदिर सापडल्यानंतर येथे २४ तास सुरक्षेसाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. यानंतर येथील अतिक्रमण काढण्यात येत आहे. संभलच्या जिल्हा प्रशासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) भस्म शंकर मंदिर, शिवलिंग आणि तेथे सापडलेल्या विहिरीच्या कार्बन डेटिंगसाठी पत्र लिहिले आहे.
हे ही वाचा :
‘पॅलेस्टाईन’ बॅग घेणाऱ्या प्रियांका वाड्रांवर पाकिस्तान खुश!
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात
उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…
१९७८ च्या दंगलीनंतर या मंदिराला कुलूप लावण्यात आल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे. आता चार दशकांनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे. १९७८ च्या दंगलीनंतरच संभलमधून हिंदूंचे पलायन सुरू झाले, त्यामुळे भीती आणि दहशतीमुळे त्यांना त्यांच्या प्राचीन मंदिराला कुलूप लावून तेथून निघून जावे लागले, असा हिंदूंचा दावा आहे. अनेक दशकांनंतर जेव्हा हे मंदिर उघडले तेव्हा परिसरातून पळून गेलेले अनेक हिंदू येथे दर्शनासाठी आले होते. एके काळी ४५ हून अधिक हिंदू कुटुंबे जिथे मंदिर सापडले तिथे राहत होते, पण हळूहळू सर्वांनी आपली घरे विकली आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले.