अमेरिकेत पुन्हा एकदा शाळेमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी मॅडिसन, विस्कॉन्सिन येथील अब्यूडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. याशिवाय गोळीबार करणारा अल्पवयीन संशयितही घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आला, असे मॅडिसनचे पोलीस प्रमुख शोन बार्स यांनी सांगितले. संशयित हा शाळेतील विद्यार्थी असल्याचे दिसते, असेही त्यांनी सांगितले.
अग्निशमन प्रमुख ख्रिस कार्बन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मॅडिसन, विस्कॉन्सिन येथील शाळेत झालेल्या गोळीबारानंतर किमान सात जणांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. अग्निशमन विभागाला सकाळी स्थानिक वेळेनुसार १०.५७ वाजता शाळेत पाठवण्यात आले, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जखमींपैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. इतर चार विद्यार्थ्यांवरही उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्यूडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये सकाळी १०.५७ वाजता गोळीबार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे अनेक जण जखमी अवस्थेत आढळले. गोळीबाराची घटना घडलेल्या मॅडिसन येथील खासगी शाळेत बालवाडी ते १२ वी पर्यंतचे ४०० विद्यार्थी शिकतात. अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :
दाऊदच्या दानिश चिकनाला ड्रग्स प्रकरणात डोंगरीतून अटक!
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात
दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी विस्कॉन्सिनमधील अब्यूडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये झालेल्या गोळीबाराचा निषेध केला. ही घटना धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जो बायडन म्हणाले की, “मॅडिसन, विस्कॉन्सिनमधील कुटुंबे, अब्यूडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये मारले गेलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या नुकसानाबद्दल शोक करीत आहेत. हे कृत्य धक्कादायक आणि बेताल आहे. यावर कारवाई करण्याची गरज आहे.” तसेच हे कृत्य अस्वीकार्य असल्याचेही ते म्हणाले.