पश्चिम आशियामधील सीरिया येथे सध्या अस्थिरता असून बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची १४ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. यानंतर बशर अल-असद यांनी रशियात आश्रय घेतल्याची माहिती असून सीरियामध्ये अशांतता आहे. सीरियामधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांनी भारताने मंगळवारी ७५ भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढले आहे. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत आणि ते उपलब्ध व्यावसायिक विमानांनी भारतात परततील, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
एमईएच्या एका निवेदनात सांगण्यात आले आहे की, त्या देशातील घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. “सईदा झैनब येथे अडकलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील ४४ ‘झैरीन’चा समावेश निर्वासितांमध्ये आहे. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत आणि उपलब्ध व्यावसायिक फ्लाइटने भारतात परततील,” असे त्यात म्हटले आहे. परदेशात भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सरकारने म्हटले आहे.
“सीरियामध्ये उरलेल्या भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +963 993385973 (व्हॉट्सॲपवर देखील) आणि ईमेल आयडी (hoc.damascus@mea.gov.in) वर अद्यायावत माहितीसाठी संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. शिवाय भारत सरकार परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत असल्याचे एमईएने म्हटले आहे.
हे ही वाचा :
ईव्हीएमवर दोन वेळा केंद्रात सत्ता भोगली, आता ओरडत आहेत!
ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार!
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
शरद पवारांचा पक्ष म्हणजे गुंड, लुटारुंची टोळी; ते गाडायचे काम देवाभाऊने केले
बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्यावर रविवारी सीरियन सरकार कोसळले आणि इतर अनेक प्रमुख शहरे बंडखोरांनी ताब्यात घेतली. बंडखोर गट हयात तहरीर अल-शामने ताबा घेतल्यावर असद यांनी देशातून पळ काढला आणि त्याच्या कुटुंबाच्या ५० वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. असद यांनी कुटुंबासह रशियामध्ये आश्रय घेतला आहे. त्यांचा जवळपास १४ वर्षांचा कार्यकाळ गृहयुद्ध, रक्तपात आणि त्यांच्या राजकीय विरोधकांवर क्रूर कारवाईने चिन्हांकित होता.