महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यानी लांबवल्या असल्याची घटना समोर आली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात १३ जणांनी चोरीची तक्रार दाखल केली असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. सोनसाखळ्या आणि पर्स असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी कार्यक्रम सायंकाळी पार पडला, या शपथविधी कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यातील मुख्यमंत्री, महायुतीचे नेते,आमदार आणि बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. तसेच मुंबईसह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात दाखल झाले होते. शपथविधी कार्यक्रम सायंकाळी ६:३० वाजता पार पडल्यानंतर आझाद मैदानातील गेट क्रमांक २ मधून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्या गळ्यातील सोनसाखळ्या अज्ञात चोरट्यानी लांबवल्या, तर अनेकांचे मोबाईल फ़ोन, पैशांची पाकिटे कार्यक्रमादरम्यान गहाळ झाले.
हे ही वाचा:
कुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक; ६ जणांचा मृत्यू
पंतप्रधानांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज करणारा अजमेरमधून अटक
कुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक; ६ जणांचा मृत्यू
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन
सोनसाखळ्या चोरीला गेल्याचे काही जणांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून चोरीच्या तक्रारी दाखल केल्या, रात्री उशिरापर्यंत जवळपास १३ जणांनी सोनसाखळी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल केल्या असून अनेकांनी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी १३ जणांचे जबाब नोंदवून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या चोरीच्या घटनेत जवळपास १३ लाख रुपयाचा ऐवज गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल करून तक्रारदारांना गहाळ झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.