माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आलेले उमेदवार उत्तम जानकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाबाबत भाष्य केलं आहे. मारकडवाडी गावातील लोकांशी संवाद साधताना उत्तम जानकर यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी शरद पवार स्वतः उपस्थित होते. दरम्यान, उत्तम जानकर यांच्या राजीनाम्यावर भाजपा माजी आमदार राम सातपुते यांनी थेट आव्हान दिले आहे. प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेट पेपरवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्यासाठी आम्ही तयार आहोत असल्याचे राम सातपुते म्हणाले.
बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे उत्तम जानकर म्हणाले. यावर उत्तर देताना राम सातपुते म्हणाले, मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना माझे आव्हान आहे कि त्यांनी कधीही निवडणूक लावावी, आम्ही तयार आहोत, परंतु प्रशासनाने निवडणूक घ्यावी. जर प्रशासनाने निवडणूक घेतली तर बॅलेट पेपरवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्यासाठी आम्ही तयार आहोत.
तसेच आजच्या शरद पवारांच्या सभेला जमा झालेले लोक हे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्यावरचे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दूध संघातील होते, असे राम सातपुते यांनी सांगितले. या लोकांनी गावातील लोकांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात अशा लोकांना धडा शिकवायला भाजपाचे आणि महायुतीचे कार्यकर्त्ये सक्षम असल्याचे सातपुतेंनी म्हटले.
हे ही वाचा :
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध होणार निवड!
संभल हिंसाचार: पत्रकार असण्याचा खोटा दावा करणाऱ्या असीम रझा झैदीला अटक
सीमाभागाचा प्रश्न सुटता कामा नये ही काँग्रेसची भूमिका!
मविआच्या नेत्यांना निवडणुकीपुरते संविधानाची आठवण, शपथविधी सोहळ्यात सिद्ध केले!