ई-कॉमर्स कंपनी असलेली वॉलमार्ट वादात सापडली असून या कंपनीच्या वेबसाईटवर हिंदू देवतांची चित्रे असलेली चप्पल आणि स्विम सूटची विक्री होत असल्याची बाब समोर येताच संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतील हिंदूंनी यावर संताप व्यक्त केला असून सर्वांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच या उत्पादनांची विक्री थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वॉलमार्टवर धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप हिंदू समजाने केला आहे. शिवाय हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या उत्पादनांची विक्री थांबवण्याची मागणी हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने केली आहे. त्यांनी वॉलमार्टला पत्र लिहून हिंदूंचे पुजनीय दैवत भगवान श्रीगणेशाच्या प्रतिमेचा अयोग्य आणि अपमानास्पद वापर केल्याचे म्हटले आहे. वॉलमार्टनेही यावर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, हिंदू समाजाच्या रोषानंतर वॉलमार्टने वेबसाइटवरून ही उत्पादने काढून टाकली आहेत. याबाबत माहिती देताना हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने स्वतः वॉलमार्टचे आभार मानले आहेत. वॉलमार्ट कंपनीच्या वेबसाईटवर ही उत्पादने विकली जात होती. मात्र, हे वादग्रस्त उत्पादन भारतात खरेदीसाठी उपलब्ध नव्हते.
हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे सदस्य प्रेम कुमार राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट कंपनीच्या वेबसाइटवर हिंदूंचे पुजनीय दैवत भगवान श्रीगणेशाचे फोटो असलेले चप्पल आणि स्विम सूट विकण्यास ठेवले होते. चॅप्स नावाची कंपनी वेबसाइटवर हे उत्पादन विकत होती. त्यानंतर प्रेम कुमार राज यांनी वॉलमार्टकडे समाजमाध्यमांद्वारे तक्रार करून या वस्तूंची विक्री त्वरित थांबवावी, अशी विनंती केली.
हे ही वाचा:
हिंदुंवरील अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत बांगलादेशींना हॉटेल्समध्ये जागा नाही!
नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार
“विजयी मतांमध्ये एकही मुस्लीम मत नाही; मी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार”
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!
दरम्यान हिंदू अमेरिकन फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर वॉलमार्टने त्यांच्या वेबसाइटवर अशा उत्पादनांच्या विक्रीबद्दल खेद व्यक्त केला. तसेच या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी पावले उचलू, असे ही वॉलमार्टने सांगितले. त्यानंतर ४८ तासांच्या आत वॉलमार्टवरून ते उत्पादन काढून टाकण्यात आले आहे.