31 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरसंपादकीयठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला...

ठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला…

खुशमस्कऱ्यांचा गराडा आणि मोदीद्वेषाने ठाकरेंचे राजकारण संपवले. 

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या राजकारणाने २०१९ मध्ये घेतलेले वळण अनेकांना धक्का देऊन गेले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. जनादेशाचा विचका करून त्यांनी हा निर्णय घेतला. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. ठाकरेंनी भाजपाच्या पाठीत खुपसला. महाराष्ट्राला सुशासन दिले असते तर लोक कदाचित हे विसरले असते. परंतु त्यांना तेही झेपले नाही. आज ना त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे, ना पक्ष. मविआचे धिरडे झालेले आहे. २० आमदारांचा खुळखुळा वाजवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. अवघ्या पाच वर्षात हे घडले. सवाल हा निर्माण होतो, मविआत सामील झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षात ठाकरेंचा कडेलोट कोणी केला?

आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. ठाकरे मातोश्री दोनमध्ये हताश अवस्थेत, आतल्या आत धुमसत, हात चोळत बसले असतील. ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरवणाऱ्या राऊतांनी त्यांचे अस्तित्व आता फक्त भाजपाला शिव्या घालण्यापुरते शिल्लक ठेवले आहे. ठाकरेंच्या द्वेषामुळे भाजपाचे काही बिघडले नाही, त्यांच्या राजकारणाची मात्र पार होळ झाली. उद्धव ठाकरे यांचे इतके वाईट दिवस कधीही आले नव्हते. ही परीस्थिती नेमकी कोणामुळे ओढवली? प्रवक्ते संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, युवराज आदीत्य ठाकरे की स्वत: उद्धव ठाकरे?

विधानसभा निवडणुकीत ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा’, असा तगादा संजय राऊत वारंवार लावत होते. त्या ठाकरे यांच्या पक्षाची गोळाबेरीज विधानसभा निवडणुकीत अवघ्या २० जागांवर आटोपली. हिंदू मतदार
जागा झालेला आहे, त्यामुळे फक्त मुस्लीम मतांच्या जोरावर राजकारण रेटता येणार नाही, हे लक्षात येताच ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना हिंदुत्व घेऊन घरोघरी जा, असे आदेश दिले आहेत. विधानसभेत हिंदूंनी लाथा घातल्या, महापालिकेत
हिंदू-मुस्लीम दोघे मिळून लाथा घालतील. थोडक्यात, ना घर का ना घाट का, या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. ठाकरे आडनावा मुळे लोक मेंढरासारखे मागे येतील, आपण सांगू त्यावर लोक विश्वास ठेवतील, या गैरसमजातून २०१९
पासून ही धरसोड चालली आहे. हा गैरसमज करून देणाऱ्या माणसाचे नाव संजय राजाराम राऊत आहे.

हे ही वाचा:

शिंदेंनी पहिल्यांदा तर अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

‘इंडी’च्या खासदारांनी अदानींविरोधातील केलेल्या आंदोलनात तृणमूल काँग्रेस गायब!

फडणवीसांना गादीसाठी नाहीतर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते!

बाबा सिद्दीकींच्या हत्येपूर्वी सलमान खानच्या हत्येची योजना होती, परंतु…

आपले आडनाव ठाकरे आहे, हा अहंकार ही पक्षप्रमुखांची समस्या होतीच. त्याच २०१४ पासून पराकोटीच्या भाजपा द्वेषाची भर पडली. कारण स्पष्ट होते. कधी काळी युतीमध्ये दुय्यम भूमिका पार पाडणारा भाजपा महाराष्ट्राच्या राजकारणात
केंद्र स्थानी आला होता. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. शिवसेनेच्या हाती काही खाती आली तरी त्यात ठाकरेंना समाधान नव्हते. फडणवीसांनी आपल्या इशाऱ्याशिवाय कोणी तसूभर हलणार नाही, अशा प्रकारे सरकारच्या चाव्या स्वत:कडे ठेवल्या होत्या. ठाकरेंच्या वाट्टेल त्या मागण्या सरळ सरळ धुडकावल्या जात होत्या. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाजेची पोलिस खात्यामध्ये पुन्हा वर्णी लावण्याचा विषय असो वा अन्य विषय. ठाकरेंची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झालेली होती. इथूनच द्वेषाचा अग्नि अधिकाधिक धगधगत गेला. भाजपाला मात देण्यासाठी ठाकरे इतके उतावीळ झाले होते, की त्यांनी भाजपाशी काडीमोड घेतला आणि सरळ शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. आगीत तेल ओतण्याचे काम राऊत करत होते. पवारांशी त्यांचे सूत जुळवण्याचे कामही त्यांनीच केले. सल्लागार पदावर बसलेला चुकीचा माणूस तुमचा बाजार उठवू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे संजय राऊत. असा सल्लागार प्रत्येक शत्रूला मिळाला, असे साकडे नेते मंडळी देवाला घालत असतील.

एकटे राऊत खड्ड्यात घालण्यासाठी पुरेसे नव्हते, म्हणून हिंदूद्वेष्ट्या अंधारेबाईंना कार्य़कर्त्यांच्या डोक्यावर आणून बसवले. राऊत आणि अंधारे हेच पक्षाचे चेहरे बनले. आई बसली, आई बसली… अशी अचकट विचकट भाषा, तितक्याच अचकट विचकट हावभावासह करणाऱ्या अंधारे बाई वारीमध्ये भाकऱ्या थापताना बघून, नवरात्रीत आरत्या ओवाळताना पाहून लोक भूतकाळ विसरतील, असे ठाकरेंना वाटले होते. त्यांना वाटले होते की कॅमेरासमोर विरोधकांना दादा, भाऊ असे संबोधून त्यांच्या पिंका टाकणाऱ्या या बाई म्हणजे उबाठा शिवसेनेच्या हाती लागलेले अमोघ अस्त्र आहे. ठाकरेंच्या दुर्दैवाने हे अस्त्र त्यांच्यावरच उलटले.

शिशुपालाने शंभर अपराध करावे तशा ठाकरेंनी शंभर चुका केल्या. महाराष्ट्रात जातीय विखार निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी त्यांनी हात मिळवणी केली. जे समाजवादी साथी शिवसेनाप्रमुखांचा आय़ुष्यभर द्वेष करत होते. त्यांच्याशी
कम्युनिस्टांशी, हिरव्यांशी… अशा प्रत्येकाशी त्यांनी चुंबाचुंबी केली जे भाजपाचा द्वेष करतात. कोणतीही कोलांटी मारावी आणि संजय राऊतांना त्यांचे समर्थन करण्यासाठी उभे करावे. संजय राऊत फक्त मराठी मीडिया हाताळू शकतात,
मराठी मानसिकता नाही, हे ठाकरेंच्या कधी लक्षातच आले नाही. २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतरच्या संजय राऊतांचे वर्णन नाकापेक्षा मोती जड असे करावे लागले. ते पक्षातील ठाकरेंनंतर नंबर दोनचे नेते बनले. असे चित्र त्यांनी निर्माण केले की उद्धव ठाकरे पक्ष चालवतायत, आणि संजय राऊत ठाकरेंना चालवतायत. मॅरेथॉन मुलाखतीमधून एकाच वेळी ते मालकाची खुषमस्करेगिरी करत होते, त्यांना गुळ लावत होते आणि हास्यास्पदही ठरवत होते. ठाकरे नावाच्या फुग्यात त्यांनी अशी काही हवा भरली की २०१९ मध्ये ते थेट शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले.

मविआचा प्रयोग राज्यात सुरू झाल्यानंतर खरे तर कर्तृत्वाची चुणूक दाखवून राज्यात झालेला विश्वासघाताचा प्रयोग जनतेला विसरायला लावणे ठाकरेंना शक्य होते. कोविडचा काळ होता. अशा काळात कार्यक्षमता दाखवण्याची संधी त्यांच्याकडे होती. परंतु ते घरी बसून राहीले. काहीही केले नाही तरी आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सल्लागार बनवण्याची क्षमता राऊतांमध्ये होती. काही न करता ते महाराष्ट्राचे विचारी, संयमी मुख्यमंत्री ठरवले जात होते. कडेलोट म्हणजे फेसबुकवर येऊन कॉमेंट्री केल्याबद्दल, जनतेला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिल्याबद्दल त्यांचा एका वृत्तसमुहाने बेस्ट सीएम म्हणून गौरव केला. मराठी वृत्तवाहीन्या, वृत्तपत्रे त्यांच्या आरत्या ओवाळण्यात मग्न होत्या. ही खुषमस्करेगिरी म्हणजेच जनमत आहे, असा गैरसमज झाल्यामुळे ठाकरे गाळात रुतत गेले. फक्त आपण रुततोय हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही. शिवसेनाप्रमुख हयात नसताना २०१४ ची विधानसभा निवडणूक ठाकरेंनी लढवली. या निवडणुकीत भाजपासोबत युती नसताना त्यांनी ६३ जागा जिंकून आणल्या. एवढ्या जागा तर कधी शिवसेनाप्रमुख हयात असतानाही मिळाल्या नव्हत्या.
त्यामुळे त्यांना पक्ष चालवता येत नव्हता, असे मानण्याचे कारण नाही. परंतु खुशमस्कऱ्यांचा गराडा आणि मोदीद्वेषाने ठाकरेंचे राजकारण संपवले.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा