30 C
Mumbai
Monday, December 2, 2024
घरसंपादकीयअजित पवार महायुतीत नसते तर?

अजित पवार महायुतीत नसते तर?

अजित पवार हे या सरकारमध्ये समतोल निर्माण करणारा महत्वाचा फॅक्टर

Google News Follow

Related

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, हाती पूर्ण बहुमत असताना अजित पवारांना एण्ट्री का दिली? असा प्रश्न अनेकांना पडला होता. विचारधारेशी, हिंदुत्वाशी संबंध नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत प्रवेश दिल्यानंतर अनेकांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आज अजितदादा नसते तर कदाचित २०१९ ची पुनरावृत्ती होऊ शकली असती. शरद पवारांना एक नवा डाव टाकण्याची संधी मिळाली असती. शिवसेनेसमोर नाक रगडण्याशिवाय भाजपाकडे एकच पर्याय शिल्लक
राहिला असता, १३२ जागा जिंकून विरोधी बाकावर बसण्याचा. अजितदादांमुळे ती वेळ आली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध नाही. याबाबत कुणाचेही दुमत नाही. त्यांना आम्ही भगवे करू असा आशावाद देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला खरा, तो कितपत प्रत्यक्षात येईल याबाबत अनेकांना शंका आहेत. निकालानंतर अजिबात आढेवेढे न घेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे भाजपाला पाठींबा जाहीर करून मोकळे झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना स्पष्ट मेसेज गेला की, आपण असलो नसलो तरी देवेंद्र
फडणवीस मुख्यमंत्री होणार. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी फार ताणून धरले नाही. त्यांना बहुधा २०१४ ची आठवण झाली असावी. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या होत्या. उद्धव ठाकरेंना चांगलेच ठाऊक होते की, आपल्या शिवाय भाजपाचे गाडे अडणार आहे. त्यामुळे त्यांनी मनमानी करायला सुरूवात केली. त्यांच्या संख्याबळाला न शोभणाऱ्या मागण्या केल्या. भाजपाला नाक रगडत हे मान्य करावे लागेल, असे त्यांना वाटले होते. तो त्यांचा गैरसमज ठरला. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला एकतर्फी पाठींबा जाहीर केला आणि सत्ता स्थापनेचा मार्गे मोकळा केला.

या पाठिंब्याचे अनेक अर्थ होते. ठाकरेंशिवाय सरकार स्थापन करणे भाजपाला शक्य होणार होतेच, शिवाय हा पाठिंब्याने उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पावर संपवली. अन्यथा १२२ आमदार हाती असूनही सरकारच्या नाड्या उद्धव ठाकरेंच्या हाती राहिल्या असत्या. ते सरकारला नाचवत राहिले असते. सत्तेत सामील झाल्यानंतरही पुढील पाच वर्षांच्या काळात ठाकरेंनी त्याची काही प्रमाणात झलक दाखवलीच. एकाच वेळी ते सत्तेत आणि विरोधात असल्यासारखे वागत होते. २०१४ मध्ये रुसलेली ठाकरेंची शिवसेना सुरुवातीला काही काळ विरोधी बाकांवर बसली होती. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. तो काळ जर एकनाथ शिंदे यांना आठवला असेल तर त्याचे एकमेव कारण अजितदादा आहेत. अजितदादा हिदुंत्ववादी नाहीत, त्यांनी तसा दावाही कधी केलेला नाही. परंतु ते शब्दाचे पक्के आहेत. देवेंद्र फडणवीसांशी त्यांचे घट्ट संबंध आहेत. सत्तेचा समतोल राखण्यासाठी हे संबंध उपयोगी पडतील हे लक्षात घेऊन त्यांना महायुती सरकारमध्ये प्रवेश देण्यात आला होता. भाजपा नेतृत्वाचा हा होरा अचूक ठरला.

हे ही वाचा:

गेल्या तीन वर्षांत खलिस्तानी प्रचारावर भारताकडून बंदीची कारवाई

युपीच्या शेतकऱ्यांच्या संसदेकडे मोर्चा

योगी सरकारचा मोठा निर्णय; महाकुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा

बांगलादेशने इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारली

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि काही अपक्ष इतकी ताकत असताना भाजपाने त्यांना मुख्यमंत्री केले कारण त्यांच्याशिवाय सरकार शक्य नव्हते. एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते तर मविआ सरकार कोसळले नसते. त्यांनी ठाकरेंशी काडीमोड घेण्याचे जे धाडस दाखवले त्याची मुख्यमंत्रीपद हीच योग्य किंमत होती. तो यूएसपी आज त्यांच्याकडे नाही. त्यावेळी फडणवीसांनीही मोठी किंमत चुकवली. कधी काळी एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या हाताखाली काम केले. त्या शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली. चेहऱ्यावरच हास्य मावळू न देता त्यांनी ते केलेही. हे फक्त फडणवीसच करू शकले.

सत्ता स्थापने नंतर हा विषय संपणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर उद्या त्यांच्याविरोधात मराठा कार्ड नक्की खेळले जाणार. जातीवरून त्यांना पुन्हा एकदा टार्गेट केले जाईल. मनोज जरांगे पुन्हा एकदा फुरफुरायला लागलेले आहेत. जरांगेंना दाणापाणी पुरवणारे नेते फक्त विरोधी बाकांवर नव्हते ते सत्तेत सुद्धा होते. ही बाब आता लपून राहिलेली नाही. हे राजकारण चेपण्यासाठी फडणवीसांकडे असलेले तुरुपाचे पान म्हणजे अजितदादाच आहेत.

आपल्याला या सरकारमध्ये जे महत्व मिळू शकले असते ते अजितदादांमुळे मिळत नाही ही बाब माहीत असल्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते त्यांच्याविरोधात दुगाण्या झाडत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. याच कारणामुळे निवडणुकीच्या आधीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात शीतयुद्ध सुरू झालेले दिसते. ५ डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी होणार आहे. अजित पवार हे या सरकारमध्ये समतोल निर्माण करणारा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर राहणार आहे. नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी नीती वापरली ती फडणवीसांनी इथे वापरावी लागेल. ती म्हणजे रशिया आणि अमेरिकेत वैमनस्य असले तरी आमची दोघांशी मैत्री आहे. तो फॉर्म्यूला फडणवीसांनी वापरला तर येत्या पाच वर्षात त्यांच्या डोक्याला फारसा ताप होणार नाही. दरम्यानच्या काळात फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानुसार अजितदादांना खरोखर भगवे करण्यात यश
आले तर त्यासारखे यश नसेल. त्याआधी फडणवीसांनाही त्यांचा रंग गडद भगवा करावा लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
204,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा