काँग्रेस नेते राहुल गांधी हे आरएसएसच्या विरोधात दिवस-रात्र ठणाणा करत असताना त्यांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएससाठी काम करत असल्याचा आरोप होतो आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी हा आरोप केला आहे. हा आरोप ऐकून हसावे की रडावे असा प्रश्न काँग्रेसजनांनाही पडलेला आहे. कारण निवडणुकीत तिकीट मिळाल्यानंतर या बंटी शेळके यांनी नागपूरातील संघ मुख्यालयासमोर साष्टांग दंडवत घातले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले स्वयंसेवक तरी किती हाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
मध्य नागपूरमधून बंटी शेळके यांना काँग्रेसने दुसऱ्यांना उमेदवारी दिली होती. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. युवक काँग्रेसचे महासचिवही आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा चार हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा पडले. भाजपाच्या प्रवीण दटके यांनी त्यांचा सुमारे १० हजार मतांनी पराभव केला. दटके संघाचे स्वयंसेवक आहेत. अनेक वर्षे भाजपाचे सक्रीय काम केल्यामुळे लोकप्रियही आहेत. दुसऱ्यांदा झालेला पराभव शेळकेंच्या चांगलाच वर्मी लागला. त्यातूनच ते नानांच्या विरोधात तांडव करत आहेत.
‘संपूर्ण निवडणूक आपण एकाकी लढलो. काँग्रेसचा एकही पदाधिकारी आपल्यासोबत नव्हता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पाडले. माझ्या विरोध करणाऱ्याला पद हा त्यांचा निकष होता, त्यामुळे निवडणुकीत त्यांनी नियुक्ती केलेल्या एकाही पदाधिकाऱ्याने माझे काम केले नाही’, अशी आरोपांची राळ शेळके यांनी उडवून दिलेली आहे. ‘नाना पटोले यांनी मला पाडले त्याचे कारण ते काँग्रेसमध्ये राहून आरएसएसचे काम करतात’, असा दावा त्यांनी केलेला आहे.
या शेळकेंचा एक फोटो निवडणुकीच्या काळात प्रचंड गाजला. नागपूरमध्ये संघ मुख्यालयाजवळ बच्छराजजी व्यास चौक आहे. हे बच्छराजजी संघाचे समर्पित कार्यकर्ते, प्रचारक होते. शेळकेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर ऐन वर्दळीच्या वेळी ते इथे आले. त्यांनी संघ मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर साष्टांग दंडवत घातले. तिथून ते जवळच असलेल्या भाजपाच्या कार्यालयात गेले. तिथे भाजपा पदाधिकाऱ्यांची गाठभेट घेतली. ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. काँग्रेस संस्कृतीत राहून संघाशी सौहार्दाचे संबंध असलेल्या नेत्यांचे किस्से कमी नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या निधनानंतर भटके-विमुक्त यांच्यासाठी गेली अनेक दशके काम करणारे संघकर्मी गिरीश प्रभूणे यांनी तरुण भारतमध्ये लेख लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘आबा, संघात न आलेला स्वयंसेवक’. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या आर. आर. पाटीलांनी संघ प्रेरणेने सुरू झालेल्या भटक्या विमुक्तांच्या कार्याला हातभार लावला होता. त्याबद्दल या लेखात प्रभूणे यांनी आबांच्या मृत्यूनंतर त्यांचे ऋण व्यक्त केले होते. काँग्रेसचे अनेक वरीष्ठ नेते संघाशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवून होते. शेळकेंनी संघ मुख्यालयासमोर घातलेले हे दंडवत अवघ्या नागपूरात प्रचंड गाजले. वर्तमानपत्रातही त्याची चर्चा झाली. परंतु, नागपूरकरांसाठी त्यात आश्चर्यकारक काहीच नव्हते. नागपूरात उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी संघाला सलाम करावाच लागतो.
शेळके राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. त्यामुळेच त्यांना तिकीट मिळाले. ही बाब नागपूरात सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या दंडवताचा बभ्रा होणे स्वाभाविक होते. शेळके यांच्या आरोपानुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रचाराचा बहीष्कार केला होता. म्हणून त्यांना संघाचा आशीर्वाद हवा होता, की तेही छुपे स्वयंसेवक आहेत, हे कळायला मार्ग नाही. संघाबाबत त्यांची भूमिकाही कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशी राहीलेली आहे. एकेकाळी याच शेळके यांनी संघाचा गणवेश जाहीरपणे जाळला होता. संघाचा निषेध कऱण्यासाठी त्यांनी हा तमाशा केला होता. संघाच्या मुख्यालयाबाहेर त्यांनी बेरोजगारांचा मोर्चाही काढला होता. ही सुद्धा अवघ्या नागपूरात गाजलेली प्रकरणे आहेत. त्यामुळे लोकांना प्रश्न पडलेला आहे की संघ गणवेश जाळणारे शेळके खरे की संघ मुख्यालयासमोर दंडवत घालणारे शेळके खरे, की आता शेळके नाना पटोले संघाचे स्वयंसेवक आहेत, असा ठणाणा करणारे शेळके खरे.
हे ही वाचा :
शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!
संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!
भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!
हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!
महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याचा ठपका नानांवर ठेवता येईल. परंतु तेवढ्याने नानांची विकेट काढता येणार नाही, म्हणून त्यांना संघासोबत जोडण्याचे काम शेळके करतायत का? विधानसभा निवडणुकीत आलेल्या हिंदुत्वाच्या लाटेत मध्य नागपूरच काय, मविआसोबत अवघा काँग्रेस पक्षच वाहून गेला आहे. महात्वाच्या पदावर राहून काँग्रेस पक्ष बुडवण्याचे काम करणे म्हणजे संघाचा एजेंडा राबवणे, अशी जर शेळकेंची व्याख्या असेल तर राहुल गांधी हेही संघाचेच आहेत, असे म्हणायला हरकत नाही. काँग्रेसचे विसर्जन करण्याची महात्मा गांधी यांची इच्छा ते पूर्ण करत असल्यामुळे ते एकाच वेळी सच्चे काँग्रेसीही आहेत. त्यांचे विश्वासू असलेल्या रेवंथ रेड्डी यांच्यावर संघाचे स्वयंसेवक असल्याचा आरोप झालेला आहे. रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. नाना पटोले हेही राहुल यांचे विश्वासू त्यांच्यावरही आता हा आरोप होतो आहे. ज्या संघाला राहुल गांधी संपवायला निघालेले आहेत, तो आता काँगेस जनांमध्येही संचारला आहे की काय असा सवाल शेळके यांच्या आरोपामुळे निर्माण झाला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)