क्रिकेटच्या मैदानावर एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील ही घटना असून यामुळे क्रीडाविश्वात शोक पसरला आहे. दहा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्यूज याला सामना खेळत असताना दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सामन्यादरम्यान डोक्याला बाऊन्सर लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर आता या घटनेमुळे पुन्हा एकदा जुन्या कटू आठवणी समोर आल्या आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान एका ३५ वर्षीय क्रिकेटपटूला आपला जीव गमवावा लागला. २८ नोव्हेंबर रोजी गरवारे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या सामन्यात ही घटना घडली. गरवारे येथे लकी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरू होता. यावेळी मैदानात क्रिकेट सामना खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने इम्रान पटेल या क्रिकेटपटूचे निधन झाले.
इम्रान लकी हा एका संघाचा कर्णधार होता आणि सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला होता. फलंदाजी करताना त्याने दोन चौकार लगावले होते. पण खेळपट्टीवर काही वेळ घालवल्यानंतर त्याच्या छातीत आणि हातामध्ये तीव्र वेदना जाणवू लागली. त्याने पंचांना तशी माहिती दिली आणि यानंतर पंचांनी त्याला मैदान सोडण्याची परवानगी दिली. पंचांच्या परवानगीनंतर इम्रान नुकताच पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता आणि अचानक तो मैदानात बेशुद्ध पडला. यानंतर त्याला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी इम्रानला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे ही वाचा :
गोंदिया- कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा अपघात; आठ जणांचा मृत्यू
शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!
संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!
भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!
इम्रानच्या पश्चात आई आणि तीन मुली असा परिवार असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी इम्रानच्या तिसऱ्या मुलीचा जन्म झाला होता. इम्रान पटेलचा सहकारी नसीर खानने सांगितले की, सामन्यापूर्वी त्याला असा काही त्रास बिलकुल जाणवला नव्हता. तो म्हणाला की, इमरानला कोणताही इतर आजार किंवा काही त्रास नव्हता. तो फिट होता. तो एक अष्टपैलू खेळाडू होता ज्याला क्रिकेटची खूप आवड होती. आम्ही सर्व अजूनही शॉकमध्ये आहोत.