उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालिन सेवा क्रमांक ११२ च्या व्हॉट्सअपवर संदेश पाठवून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करायला सुरूवात केली आहे. योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी देखील अशी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या आपत्कालिन क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर २९ एप्रिल रोजी संध्याकाळी एक संदेश पाठवण्यात आला. या संदेशात मुख्यमंत्र्यांजवळ ४ दिवस शिल्लक आहेत. तोवर माझे काय करायचे ते करा, ५व्या दिवशी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना ठार मारणार आहे, असे म्हटले होते.
हे ही वाचा:
शरद पवारांच्या ‘अदृश्य हातांना’ पंढरपूरची एक सीट जिंकता आली नाही
ममतांच्या हिंसाचाराविरूद्ध भाजपाचे देशव्यापी धरणे आंदोलन
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन
हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांना बंगालमध्ये तैनात करा
या घटनेनंतर पोलिसांनी जलदगतीने कारवाईला सुरूवात केली. या मेसेज संदर्भात सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर या क्रमांकाचा तपास करण्यासाठी एक सर्व्हेलन्स टीम तयार करण्यात आली. सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्याच्या कंट्रोल रुम डायल ११२चे ऑपरेशन कमांडर अंजुल कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे संशयिता विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबरच आरोपीला अटक करण्यासाठी देखील एक टीम तयार करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याचा हा पहिला प्रसंग नाही. त्यांना यापूर्वी देखील अशी धमकी मिळाली आहे. गेल्या वर्षी मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती.