महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. दरम्यान, राज्यात आचारसंहिता लागली असून या काळात पैशांचे गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासन आणि निवडणूक आयोग सज्ज आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून जागोजागी नाका बंदी करण्यात आली असून चौक्या उभ्या केल्या आहेत. संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत असून कारवाई केली जात आहे. कारवाई दरम्यान, राज्यभरातून अनेक ठिकाणहून रोख रक्कम, सोने, चांदी आणि दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.
यंदा आचारसंहितेच्या काळात बेहिशेबी रोकड, अवैध दारू, सोने- चांदी, अमली पदार्थांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या काळात एकूण ६६०.१६ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पाचपट जप्ती झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत १२२.६७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
विधानसभा २०२४ निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. या कालावधीत बेहिशेबी रोकड, अवैध दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातूंविरोधात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात मुंबई शहर आणि उपनगरांत सर्वाधिक मालमत्तेची जप्ती झाली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात २२९.८३ कोटी रुपये, तर मुंबई शहर जिल्ह्यात ४६.८६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सर्वात कमी मालमत्तेची जप्ती परभणी जिल्ह्यात झाली. तेथे ८९.४८ लाख रुपये मूल्याच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे
मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात
सुनियोजित पत्रकार परिषदेत अदाणींनी केली राहुल गांधीची सुटका…
अतुल भातखळकरांची ‘विजय संकल्प रॅली’, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा सहभाग!
माहितीनुसार, १८ नोव्हेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ६६०.१६७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जप्त केलेल्या मालमत्तेच्या तुलनेत पाच पटींहून अधिक आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण १२२.६७ कोटी रुपये मूल्य असलेली संपत्ती जप्त करण्यात आली होती.