आदिवासी हा महाराष्ट्राचा अस्सल भूमीपूत्र आहे. त्याचा हक्क पहिला असला पाहिजे हे महायुतीचे वचन आहे. कोणीही उठाव आणि आदिवासींना फसवावं ही काँग्रेसनीती आता चालणार नाही. आदिवासी बांधव, भगिनी जागे झालेत. कोण आपला कोण परका याची जाणीव त्याला झालीय. वर्षानुवर्ष आदिवासी बांधवाला दुर्गम भागात अडकवून त्यांच्या जमीन हडपण्याचे काम ज्यांनी केले त्यांना आता हद्दपार करायचे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदूरबार आणि धुळ्यातील मतदारांना केले. अक्कलकुवा येथे आमशा पाडवी आणि धुळ्यातील साक्री येथे मंजुळा गावित यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
साक्रीतील सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सोयाबीन शेतकऱ्यांबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी आजच चर्चा केली. केंद्र सरकारने राज्य सरकारला जितकी आवश्यक आहेत तितकी खरेदी केंद्र सुरु करण्यास निर्देश दिले आहेत. नाफेडच्या माध्यमातून सोयाबीनला ४८९२ रुपये हमीभावाने खरेदी होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. १५ टक्के मॉईश्चर असले तरीही सोयाबीनची खरेदी होणार. सोयाबीन पेंडीच्या निर्यातीसाठी आवश्यक किंमतींमधील तफावत सरकार भरुन काढणार आहे. कॉटन मिडीयम स्टेपल ७१२१ रुपये आणि लाँग स्टेपल कॉटन ७५२१ रुपये दराने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५००० रुपयांची मदत केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. गिरणा नार पार नदी जोड प्रकल्पाला ७५०० कोटींची तरतूद केली आहे. साक्रीतील बंद पडलेला कारखाना सुरु केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक, म्हणाले- ‘सत्य बाहेर येत आहे’
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक
केजरीवालांना धक्का, मंत्री कैलाश गेहलोतांचा पदाचा राजीनामा, पक्षही सोडला
मोदी म्हणाले म्हणून, १२ वर्षानंतर राहुल गांधींची बाळासाहेबांना आदरांजली!
तत्पूर्वी नंदूरबारमधील अक्कलकुवा येथे महायुतीचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली. आमशा पाडवी यांनी मागील दोन वर्षात ४८२ कोटींचा निधी आणला. ते पुन्हा झाले की इथं ४८०० कोटींचा निधी देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पेसा भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पेसा भरतीच्या माध्यमातून ८५०० आदिवासी तरुणांना सरकारी नोकरी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इथं ३५ वर्ष आमदार असलेल्याने एकही उद्योग आणला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आमदारावर केली. त्यामुळे इथल्या बांधवांना स्थलांतर करावे लागते. आता तुम्हाला त्या आमदाराला स्थलांतरित करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून पाच महिन्यांचे ७५०० रुपये दिले. सरकारने लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली. यात लाडक्या भावांना दर महिन्याला १० हजार, ८ हजार आणि ६ हजार रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जातो. लाडक्या बहिणींना १५०० रुपयांवर ठेवणार नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वर्षाला १५००० रुपये, वृद्धांचे पेन्शन २१०० रुपयांपर्यंत वाढवणार, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देणार, २५ लाख रोजगार आणि १० लाख तरुणांना १० हजार रुपयांना दरमहा प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.