मणिपूरमध्ये जातीय संघर्षामुळे हिंसाचारात दिवसेंदिवस वाढ होत असून हा संघर्ष शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे या भागात शांतता आणि कायदा, सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने या संघर्षाची आणि हिंसाचाराची दखल घेतली आहे. मणिपूरमधील हिंसाचारावर उपाय म्हणून सुरक्षा दलांनी आवश्यक ती पावले उचलावीत असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी दिले आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी कडक पावले उचलावीत, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गेल्या सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ११ संशयित हल्लेखोर मारले गेले होते. त्यांनी जिरीबाम जिल्ह्यातील पोलिस स्टेशन आणि सीआरपीएफ कॅम्पवर अंदाधुंद गोळीबार केला होता. तसेच महिला आणि मुलांसह काही नागरिकांचे अपहरण केले होते. यातील काहींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.
कोणीही हिंसक आणि विघटनकारी कृत्यांचा प्रयत्न करत असेत तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे. प्रभावी तपासासाठी महत्त्वाची प्रकरणे एनआयएकडे सोपवण्यात आली आहेत, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांना सहकार्य करावे, असे आवाहनही गृह मंत्रालयाने केले आहे.
हे ही वाचा :
ठाकरे गटाचे सर्व बालेकिल्ले, गड जनतेने उध्वस्त करून टाकलेत
मोदी सरकारकडून राज्यात रेल्वेची १ लाख ६४ हजार कोटींची गुंतवणूक
पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील, गयानाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना
नक्षलप्रभावित भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट; जीवितहानी नाही
दरम्यान, केंद्र सरकारने मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात पुन्हा सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत एखाद्या क्षेत्राला अशांत घोषित केले जाते, ज्यामुळे सुरक्षा दलांना तेथे प्रभावी कारवाई करता येते. मे २०२३ मध्ये राज्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत. इम्फाळ खोऱ्यात राहणारा मैतेई समुदाय आणि आसपासच्या डोंगराळ भागात राहणारा कुकी समुदाय यांच्यात हिंसाचार सुरू आहे. जिरीबाम जिल्ह्याला सुरुवातीला संघर्षाचा फटका बसला नाही. मात्र, जून २०२४ मध्ये एका शेतकऱ्याचा मृतदेह सापडल्यानंतर या जिल्ह्यातही हिंसक संघर्ष सुरू झाला.