गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभावित अशा भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागात नव्या पुलाचे बांधकाम सुरू असून तेथे स्फोट झाल्याची घटना शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी उजेडात आली. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय हालचाली सुरू असताना हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीवरी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाजवळ रात्री मोठा आवाज झाला. दरम्यान, सकाळी पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आल्या. या परिसरात सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अमित शाह यांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली दौरा असून यामुळे आता खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
वाशी चेकनाका परिसरातून ८० कोटींची चांदी जप्त
अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या वडिलांना २५ लाखांचा गंडा; पाच जणांविरोधात तक्रार दाखल
सरसंघचालक मोहन भागवत, इस्रो प्रमुख सोमनाथ यांच्याकडून ‘सनातन’चे कौतुक!
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’
या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकामार्फत तपासणी केली जात असून या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून भामरागड हा छत्तीसगडला लागून असलेला परिसर आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पोलीस यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.