१९८० ते ९० च्या दशकात मुंबईतील समुद्रातील जहाजातून तेल चोरी करणारा तसेच सोनं,चंदनाची समुद्रामार्गे तस्करी करणारा एकेकाळचा समुद्री डॉन मोहम्मद अली याचा रविवारी सकाळी जसलोक रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला. मोहम्मद अली याचे वय वर्षे ७४ होते.
मोहम्मद अली याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जवळचे संबध होते. मोहम्मद अली याने दक्षिण मुंबईतूनच बसपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती, मात्र त्यात त्याचा पराभव झाला होता.
मोहम्मद अली हा दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा या ठिकाणी राहण्यास होता. डोंगरी, पायधुनी परिसरात त्याची मोठी संपत्ती आहे. मागील काही आठवड्यापूर्वी मोहम्मद अली याला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मोहंमद अली याला मागील अनेक वर्षांपासून मधुमेह ,उच्च रक्तदाब हे आजार होते.
गोदीतील भंगार चोर ते तेल माफिया
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यात राहणारा मोहम्मद अली हा वडिलांशी भांडण करून १९६०मध्ये मुंबईत पळून आला होता. मुंबईत तो काकासोबत राहू लागला आणि गोदीच्या बाहेर असलेल्या काकाच्या सायकलच्या दुकानात पंक्चर काढण्याचे काम करीत होता. गोदीमध्ये काम करणाऱ्याकडे त्यावेळी सायकली असायच्या आणि ते कर्माचारी मोहम्मद अलीकडे हवा भरायला, पंक्चर काढायला येत होती, त्यातून मोहम्मद अलीची गोदीतील कर्माचारी आणि अधिकारी यांच्याशी चांगलीच ओळख झाली होती.
१९६० च्या दशकात समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीचे जहाज मुंबईच्या बंदरावर लागल्यानंतर त्यातील माल गोदीमध्ये रिकामा होत होता. मोहम्मद अली हा गोदीत जाऊन थोडा थोडा माल बाहेर काढू लागला आणि सायकलवरून तो नागापाडा शुक्लाजी स्ट्रीट या ठिकाणी त्याची विक्री करू लागला होता. त्यावेळी मोहम्मद अलीला होणाऱ्या कमाईतून काही रकम गोदीतील कामगार, अधिकारी यांना मिळत होती. हळूहळू मोहम्मद अली हा गोदीमधून महागाड्या वस्तू काढून विकू लागला. घड्याळे, रेडिओ, आदि वस्तू तो बाहेर काढून विकू लागला.
गोदीमध्ये मोहम्मद अली छोट्या मोठ्या चोऱ्या करता करता जहाजातील काळे तेल काढणाऱ्या चोराच्या संपर्कात आला आणि जहाजातून तेल चोरी करू लागला. गोदीतील अधिकारी आणि कर्मचारी याच्यासोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन मोहम्मद अली काही वर्षातच समुद्रातील तेल माफिया बनला. जहाजातून तेल चोरी करणाऱ्या टोळ्या मोहम्मद अलीच्या इशाऱ्यावर काम करू लागल्या होत्या. तेल चोरीतून होणाऱ्या बक्कळ कमाईतील काही हिस्सा तो गोदीतील अधिकारी,कर्मचारी यांना वाटू लागला होता.
तेलचोरीसोबत तस्करी
जहाजातून तेल चोरी करता करता मोहम्मद अलीची ओळख जहाजावरिल कर्माचारी आणि कप्तान यांच्या सोबत झाली आणि त्याच्या मदतीने मोहम्मद अली ने सोनं,रक्तचंदनाची परदेशात तस्करी सुरू केली.
गुंड टोळ्यांची नजर
मोहम्मद अली याचे गोदीतील आणि समुद्रातील वाढते वर्चस्व आणि वाढत्या कमाईवर मुंबईतील गुंड टोळ्यांचा डोळा होता, त्याला गुंड टोळ्यांकडून येणाऱ्या धमकीमुळे मोहम्मद अली याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत हातमिळवणी केली होती. दाऊदच्या हातमिळवणीमुळे इतर छोट्यामोठ्या गुंडापासून मोहम्मद अलीची सुटका झाली होती.
भंगार माफिया मदार
हत्येमुळे झाली होती अटक
२०१० मध्ये मुंबईत झालेल्या भंगार माफिया चांद मदार याची हत्या झाली होती. या हत्येमध्ये मुंबई पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर मोहम्मद अली यांचे नाव समोर आले होते. मोहम्मद अली याने चांदच्या हत्येसाठी पैसे पुरवले होते असा आरोप मोहम्मद अलीवर होता. त्याला या प्रकरणात अटक झाल्यानंतर मोहम्मद अली या कुप्रसिद्धीच्या झोतात आला होता. मात्र न्यायालयाने त्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.
दरम्यान चंदन तस्करी प्रकरणी मोहम्मद अली याला काही वर्षांपूर्वी गुन्हे शाखेच्या कक्ष तीनने अटक केली होती. समुद्रामार्गे चीनला रक्तचंदनाची तस्करी करीत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. या गुन्ह्यात मोहम्मद अली हा जामीनावर बाहेर होता.
असे मानले जाते की, मोहम्मद अलीला गेल्या दीड दशकात चार खून प्रकरणात निर्दोष मुक्त केले गेले. यामध्ये गूढ परिस्थितीत (अपघाती) पोलिस खबरी सलीम लंगाडे यांचा मृत्यू आणि नरसिंहच्या मामाच्या हत्येचा समावेश आहे.