जम्मू- काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी ग्राम संरक्षण गटाच्या (व्हीडीजी) दोन सदस्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या ‘काश्मीर टायगर्स’ या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दहशतवादी गटाने डोळ्यांवर पट्टी बांधून पीडितांच्या मृतदेहाच्या प्रतिमा देखील शेअर केल्या आहेत. नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावे असून दोघेही ओहली कुंटवारा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.
माहितीनुसार, नजीर आणि कुलदीप हे दोघेही त्यांची गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. कुलदीप याचा भाऊ पृथ्वी म्हणाला की, “आम्हाला माहिती मिळाली आहे की माझा भाऊ आणि नजीर यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली आहे. ते ग्राम संरक्षण रक्षक (व्हीडीजी) होते आणि नेहमीप्रमाणे गुरांना घेऊन चरायला गेले होते.” सध्या या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतरांनी या हत्येचा निषेध केला आहे. “किशतवाडमधील व्हीडीजी सदस्यांवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शूर पुत्रांच्या कुटुंबियांसाठी मी मनापासून शोक व्यक्त करतो. आम्ही सर्व दहशतवादी संघटना नष्ट करण्याचा आणि या कृत्याचा बदला घेण्याचा दृढ निश्चय करतो,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांची संख्या वाढली असून १४ ऑक्टोबर रोजी बारामुल्लामधील गुलमर्गजवळ झालेल्या हल्ल्त्यात दोन सैनिक आणि दोन नागरिक पोर्टर मारले गेले. शोपियानमध्ये, १८ ऑक्टोबर रोजी बिहारमधील एका स्थलांतरित कामगारावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी गांदरबलमध्ये सात बोगदा बांधकाम कामगारांची हत्या करण्यात आली होती.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?
राज ठाकरेंनी काढला फतवा, तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो पाठीशी उभे राहा!
अमेरिकेत चाय-बिस्कुटांसह सोरोस तंत्राचाही पराभव…
संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही!
दहशतवाद्यांच्या हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी त्यांची कारवाई तीव्र केली आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईनंतर अलीकडच्या काही दिवसांत सात दहशतवादी ठार झाले आहेत. ६ नोव्हेंबरला बांदीपोरा आणि कुपवाडा येथे प्रत्येकी एक, ५ नोव्हेंबरला बांदीपोरामध्ये दोन, श्रीनगर आणि अनंतनागमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर उस्मानसह अन्य तीन जण ठार झाले.