तुम्ही हिंदू म्हणून एकत्र येऊ नये म्हणून एक संत काम करतो आहे. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. मराठवाडा, विदर्भात संतांची परंपरा आहे. अजून एक संत आले आहेत संत शरदचंद्र पवार, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावतीतील भाषणात शरद पवारांवर घणाघाती टीका केली.
शरद पवारांमुळेच महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण झाले ही त्यांनी याआधी व्यक्त केलेली भूमिकाही पुन्हा मांडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राज ठाकरे इथे आले होते. ते म्हणाले की, या महाराष्ट्रात जे हिंदुत्वाचं माहोल होतं ते बरबाद कसं करायचं त्यासाठी जातीपातीत महाराष्ट्राला विभागायचं ठरवलं. तू ओबीसी, तू मराठा, तू या जातीचा तू त्या जातीचा… प्रत्येक माणसाला जातीबद्दल प्रेम असतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. तेव्हापासून स्वत:च्या जातीबद्दल प्रेम नव्हे दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष सुरू झाला.
हे ही वाचा:
आधी आपल्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न तर लावा!
ऍमेझोन, फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांवर ईडीकडून कारवाई; २० ठिकाणी छापेमारी
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही
काँग्रेसमधील बंडखोरांना सहा वर्षांसाठी टाटा, बाय-बाय
राज ठाकरे यांनी जुनी आठवण सांगितली, ते म्हणाले की, त्यावेळी एक पुस्तक आलं होतं जेम्स लेनचं. महाराजांबद्दल एक दोन वाक्य वेडीवाकडी लिहिली होती. कुणीही वाचलं नव्हतं पण ते पुस्तक वाचून महाराष्ट्रात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गजाननराव मेहेंदळे यांनी पत्रकार परिषद घेत या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. तेव्हा यांना कळलं की असं काहीतरी पुस्तक आलंय. मग राजकारण सुरू झालं. पुण्यामधील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला झाला. जाळपोळ झाली. का तर म्हणे त्यांनी जेम्स लेनला ही माहिती पुरवली. मग मराठा आणि ब्राह्मण असा वाद सुरू केला. आता मराठा आणि ओबीसी वाद सुरू केला. हेच त्याचे जनक आहेत.
राज ठाकरेंनी सांगितले की, जातीपातीत महाराष्ट्र विभागला तरच आपल्या मतांच्या पेट्या भरतील. याच एका मुद्द्यावर हे निवडणूक लढवत राहिले. एखादा आजार झाला तर जातीचा डॉक्टर शोधता की, चांगला डॉक्टर शोधता. पण हे सगळं राजकारण करत बसायचं आणि माथी भडकवत राहायची. नागपूरच्या सभेत हीच गोष्ट सांगितली. जरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हाच सांगितलं की, हा प्रश्न सुटणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे मुद्दामहून सुरू ठेवायचं. आता तुम्ही मतदान करून घरी जाल तेव्हा सगळं शांत होईल. असा महाराष्ट्र करायचा आहे आपल्याला. भविष्यातील पिढ्यांचा काही विचार करणार आहोत की नाही.