24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणदोस्त दोस्त ना रहा!?

दोस्त दोस्त ना रहा!?

Google News Follow

Related

माहीम मतदारसंघात अखेर तिरंगी लढत होणार हे निश्चित झालेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला आणि मनसेचे अमित ठाकरे, उबाठाचे महेश सावंत तसेच सरवणकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून सरवणकर यांना माघार घेण्यासाठी विनवणी केली जात होती, एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याचेही सांगितले जात होते, प्रत्यक्षात ४ नोव्हेंबर या अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही सरवणकर हे अडून राहिले. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचेही ठरविले पण राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे सरवणकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्का केला. या सगळ्या घडामोडीत सर्वसामान्य मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण होतो तो एकीकडे भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिलेला असताना सरवणकर मात्र महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक कशी काय लढवत आहेत? हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. तीच स्थिती वरळी मतदारसंघाचीही आहे. तिथे आदित्य ठाकरे हे उबाठा गटाचे उमेदवार आहेत तर समोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा तसेच मनसेचे संदीप देशपांडे उभे आहेत. तिथेही हीच स्थिती आहे. अर्थात, तिथे भाजपाने देशपांडे यांना समर्थन देणार असल्याचे म्हटलेले नाही. पण महायुती म्हणून मिलिंद देवरा तिथे उभे आहेत. अशावेळी लोकांच्या मनात पुन्हा प्रश्न उभा राहतो की, इथे नेमके काय होणार? महायुती म्हणून मिलिंद देवरांच्या पाठीशी सगळे असणार की देशपांडे यांना पाठिंबा देणार?

एकूणच शिंदे यांनी दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केलेले असल्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा मार्ग तितकासा सोपा राहिलेला नाही. त्यावेळी प्रश्न निर्माण होतो की, गणपतीच्या निमित्ताने किंवा नव्या घराला भेट देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंची दादरच्या शिवतीर्थावर भेट घेतात, पुष्पगुच्छ देतात, तेव्हा ती भेट केवळ गप्पा मारण्यापुरतीच असते का मग तीच भावना राजकारणात दिसत का नाही?

या भेटीगाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात होत असल्या तरी गेल्या काही दिवसांतील त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया मात्र एकमेकांविरोधातील आहेत. स्वतः राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत आगामी निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असे विधान केले होते. त्यातून एकच अर्थ निघत होता तो म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही एका मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह घेणे योग्य नव्हते, असे विधान केले होते. मनसेचे कल्याणमधील उमेदवार राजू पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली होती. या सगळ्या घडामोडींचे प्रतिबिंब माहीम आणि वरळी मतदारसंघातील लढतीत पडले आहे का, असे वाटते.

हे ही वाचा:

अकबर, एन्थनी मागे सरले, आणि जरांगे हादरले… मालकाच्या इशाऱ्यावरून माघार!

‘राज ठाकरेंनी भेट नाकारली, आता निवडणूक लढवणार’

जरांगेंची निवडणुकीतून माघार, भुजबळ म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये’

प्रवासी खचाखच भरले, उत्तराखंडमध्ये बस कोसळून ३६ ठार!

सरवणकर हे माहीममधील विद्यमान आमदार आहेत. याआधीही दोनवेळा तिथे ते निवडून आलेले आहेत, त्याआधीही नगरसेवक राहिलेले आहेत. अशावेळी एकीकडे अमित ठाकरे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला भाजपा पाठिंबा देत असेल तर तिथे सरवणकर हे मात्र महायुतीचे उमेदवार म्हणून विरोधात उभे राहात असतील तर लोकांच्या मनात शंका उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. सगळीकडेच प्रत्येकाला तडजोड करणे शक्य नसते. मात्र एकीकडे सरवणकर यांचे मन वळवणे शक्य नसेल तर मग निदान वरळीत तरी संदीप देशपांडे यांना आपला पाठिंबा आहे, हे एकनाथ शिंदे यांना दाखविता येणे शक्य नव्हते का? दुसरीकडे मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्या विरोधात शिंदे यांनी उमेदवार दिलेला नाही.

किंबहुना, महायुतीचा उमेदवार नाही. तिथे एकनाथ शिंदे यांनी जुने ऋण लक्षात ठेवलेले आहे. शिवडीमध्ये बाळा नांदगावकरांविरोधात उमेदवार न देऊन एकनाथ शिंदेंनी २२ वर्षांपूर्वीची परतफेड केली का? अशी चर्चा आहे. २६ ऑगस्ट २००१ ला आनंद दिघे यांचं निधन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ठाण्यातले शिवसेना नेते रघुनाथ मोरे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख करण्यात आलं, त्यावेळी बाळा नांदगावकर हे ठाण्याचे शिवसेना संपर्क प्रमुख होते. काही महिन्यांनंतरच रघुनाथ मोरे यांचा अपघात झाला, त्यानंतर ठाण्याचा पुढचा जिल्हाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. एकनाथ शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यात संपर्क प्रमुख असलेल्या बाळा नांदगावकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ही सगळी परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधांची नेमकी काय स्थिती आहे, याविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न उपस्थित राहणे स्वाभाविक आहे. मागे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन म्हणाले होते की, मनसे आणि शिवसेना यांच्यातील संबंध फेव्हिकॉल का जोड है…पण तो जोड बाहेरून नको तर आतूनही हवा. राज ठाकरेंनी केलेल्या या विधानाचा अर्थ हाच आहे की, हे संबंध गप्पांपुरते आहेत की ते आतूनही तेवढेच मजबूत आहेत?

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा