मुंबई पाठोपाठ आता ऐन विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी नाराज होत हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. यानंतर नाराज असलेल्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी थेट शिवधनुष्य हाती घेत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसला जबरदस्त दणका बसला आहे. जयश्री जाधव यांना नाकारून राजेश लाटकर यांना तिकिट देण्यात आले, पण त्यांच्याही उमेदवारीला विरोध झाल्याने मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर रिंगणात असून आता जयश्री जाधव यांच्या पक्षात येण्याने त्यांना ताकद मिळाली आहे.
पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जयश्री जाधव यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करत आहे. चंद्रकांत जाधव जरी काँग्रेसचे आमदार होते तरी ते मूळचे शिवसेनेचेच होते. त्यामुळे आज मलाही आनंद होतो आहे की, पक्षाशी असलेले जुने नाते वृद्धिंगत होत आहे.
हे ही वाचा :
बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक
दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा!
५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेत असलेले चंद्रकांत जाधव कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु, पक्षाने संधी न दिल्याने सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक जिंकली. २०२१ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना संधी दिली आणि त्याही आमदार म्हणून निवडणून आल्या होत्या. पण यंदा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही.