विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यातील अनेक दिग्गज नेतेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अजित पवार यांनी बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन केलं.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. शिवाय ही लढाई काका विरुद्ध पुतण्या अशीही असणार आहे. दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांनी उमेदवारी अराज भरताना मोठे शक्ती प्रदर्शन केले. तसेच ग्रामदैवत कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन अजित पवार आणि युगेंद्र पवार दोघांनीही घेतले.
अजित पवार यावेळी म्हणाले की, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जेव्हा जेव्हा माझ्या विरोधात उमेदवार उभा केला जातो तेव्हा मी त्याला मजबूत उमेदवार मानतो आणि त्यानुसार प्रचार करतो. यावेळीही बारामतीची जनता मला चांगल्या मतांनी विजयी करेल आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तसेच ते म्हणाले की, “लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभं करून तीच चूक शरद पवार यांनी करायला नको होती,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा..
ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांच्या घरी कार्यक्रमात भाग घ्यायला हरकत नाही!
माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत; अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज
भारताच्या चिराग चिक्काराची सुवर्णझेप, ठरला दुसरा कुस्तीपटू!
लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये काका आणि पुतण्यात लढत होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.