कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी कॅनडामध्ये जोर धरू लागली आहे. खासदारांनी त्यांना राजीनामा देण्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. लिबरल खासदारांनी पार्लमेंट हिलवर एकत्र येऊन ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवाय एक बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये नाखूष खासदारांनी जस्टिन ट्रुडो यांच्याकडे त्यांच्या तक्रारी व्यक्त केल्या, ज्याने पक्षात वाढत असलेला असंतोष उघडपणे उघड केला आहे.
हाऊस ऑफ कॉमन्सच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत खासदारांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनाम्याची मागणी लावून धरली. बुधवारच्या बैठकीत, खासदारांनी त्यांच्या चिंता आणि निराशा थेट ट्रूडो यांच्याकडे नेल्या. ट्रुडो यांना त्यांच्याच पक्षातून वाढत्या दबावाचा सामना करावा लागत आहे. अशातच या नाराज असलेल्या खासदारांनी त्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सीबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, २४ खासदारांनी ट्रुडो यांना पायउतार होण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत ब्रिटिश कोलंबियाचे खासदार पॅट्रिक व्हीलर यांनी ट्रुडो यांच्या राजीनाम्याच्या बाजूने एक कागदपत्र सादर केले. असे सांगण्यात आले की जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा डेमोक्रॅट्सना आघाडी मिळत असल्याचे दिसत होते. लिबरल पक्षाच्या बाबतीतही असेच घडू शकते असे दस्तऐवजात म्हटले आहे.
हे ही वाचा :
प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!
‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १७० हून अधिक रेल्वे रद्द; कोलकातामधील विमान वाहतूक स्थगित
जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला
पुण्यात पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू
कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षाच्या खासदारांची संख्या १५३ आहे. “ ट्रुडो यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे,” असे संसदेतील लिबरल खासदार केन मॅकडोनाल्ड यांनी नमूद केले आहे. मॅकडोनाल्ड हे लिबरल पक्षाचे न्यूफाउंडलँडमधील खासदार आहेत. त्यांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. पण हे पत्र सार्वजनिक करण्यात आलेले नाही. दरम्यान ट्रुडो यांनी याआधी, पुन्हा निवडणूक रिंगणात उतारण्याची इच्छा बोलून दाखवली होती. दरम्यान, गेल्या सुमारे १०० वर्षांत एकाही कॅनडाच्या पंतप्रधानाला सलग चार वेळा विजय मिळवता आलेला नाही.