भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिने तिच्या पुस्तकात तिची माजी सहकारी कुस्तीपटू आणि भाजपा नेत्या बबिता फोगट यांच्यावर टीका केली आहे. शिवाय साक्षी मलिकने पुस्तकासंदर्भात बोलताना एका मुलाखतीत सांगितले की, बबिता फोगटला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे आहे. बबिता फोगटने कुस्तीपटूंना ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले, कारण बबिताला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे होते. यावर आता बबिता फोगट यांनी प्रतिक्रिया दिली असून साक्षी मलिक हिच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
बबिता फोगट यांनी एक्सवर पोस्ट करून साक्षी मलिकवर टीकास्त्र डागले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “स्वतःच्या चारित्र्याने चमक, उधार घेतलेला प्रकाश किती दिवस टिकणार? कुणाला विधानसभा मिळाली, कुणाला पद मिळाले. ताई, तुम्हाला काही मिळाले नाही, आम्ही तुमचे दुःख समजू शकतो. पुस्तक विकण्यासाठी आपली इज्जत विकली.” बबिता फोगट यांनी आपल्या पोस्टमध्ये साक्षीचे नाव घेतले नसले तरी त्यांची पोस्ट साक्षीसाठी असल्याचे बोलले जात आहे.
साक्षी मलिका हिने ‘विटनेस’ नावाच्या पुस्तक रूपातून स्वतःचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात जंतरमंतरवर निदर्शने केली होती आणि त्यांच्यावर महिला खेळाडूंचे शोषण केल्याचा आरोप केला होता. या निषेधाला प्रोत्साहन देण्यामध्ये माजी महिला कुस्तीपटू बबिता यांचाही समावेश असल्याचे साक्षीने सांगितले.
हे ही वाचा..
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : हत्येपूर्वी स्नॅपचॅटचा वापर झाला
हसीना अजूनही पंतप्रधान आहेत का?, राष्ट्रपती शहाबुद्दीन म्हणाले- माझ्याकडे त्यांचा राजीनामा नाही!
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दिवाळी कार्यक्रमादरम्यान राडा
साक्षी मलिक म्हणाली की, काँग्रेसने आमच्या निषेधाला पाठिंबा दिल्याच्या अफवा आहेत. भाजपाच्या दोन नेत्यांनी आम्हाला हरियाणात आंदोलन करण्याची परवानगी मिळवून दिली होती. ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात सामना करण्यासाठी बबिता फोगटने आम्हाला भाग पाडले कारण, बबिताला ब्रिजभूषण सिंग यांच्या जागी बसायचे होते. यासाठी बबिताने बैठक बोलवली. आम्ही तिच्या प्रभावाने हे सर्व केले नाही. महासंघात लैंगिक छळ आणि विनयभंगासारख्या घटना होत होत्या. आमचा विश्वास होता की एक महिला प्रभारी बनली तर चांगले होईल आणि तिच्या मनात देखील तेच होते, आम्हाला देखील याची जाणीव झाली होती. पण, ती आमच्यासोबत एवढा मोठा खेळ खेळेल याचा आम्हाला अंदाज नव्हता. बबिता आमच्या सोबत आंदोलनाला बसेल आणि आवाज उठवेल वाटत होते कारण तिच्यावेळी देखील अशा काही घटना तिला ऐकायला मिळाल्या होत्या, बघायला मिळाल्या होत्या. मात्र, तसे काही झाले नाही.