बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांना हटवल्यानंतर राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बांगलादेशी वृत्त डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ढाका येथील राष्ट्रपती भवनासमोर हजारो लोक जमले होते. शेख हसीना यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्यामुळे लोक संतप्त झाले होते.
राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी रविवारी (२० ऑक्टोबर) एका मुलाखतीत म्हणाले होते, मी नुकतेच ऐकले की शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याशी संबंधित कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी मी अनेकवेळा प्रयत्न केले होते, पण कदाचित त्यांच्याकडे त्यासाठी वेळ नव्हता.
राष्ट्रपतींच्या या वक्तव्यानंतर हजारो लोक एकत्र होवून त्यांच्याविरोधात निदर्शने केली. राजधानी ढाक्यातील राष्ट्रपतींचे निवासस्थान ‘बंग भवन’समोर मंगळवारी (२२ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास लोकांनी निदर्शने करत राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली.
हे ही वाचा :
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दिवाळी कार्यक्रमादरम्यान राडा
कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू
“आमचे संबंध इतके घनिष्ठ की, कोणत्याही अनुवादकाची गरज नाही”
राष्ट्रपतींनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. राष्ट्रपतींनी २ दिवसात पदाचा राजीनामा द्यावा, असे आंदोलकांनी म्हटले. आंदोलकांचा जमाव हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. चेंगराचेंगरीत किमान ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या या वक्तव्यानंतर आता बांगलादेशात घटनात्मकदृष्ट्या शेख हसीना अजूनही पंतप्रधान आहेत की नाही, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.