उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जाणाऱ्या या बातम्यांवर बरीच चर्चा सुरू आहे. खळबळ माजवण्यासाठी या बातम्या पेरल्या जातायत की प्रत्यक्षात असे काही घडले आहे? या बातम्यांचे टायमिंग असे आहे की, कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. गंभीरपणे दखल घ्यावीच लागेल. काँग्रेसला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि भाजपाच्या समर्थकांनाही. ही एक खेळी आहे जी ठाकरे यांनी यापूर्वीपण खेळली आहे. अगदी यशस्वीपणे. पुन्हा एकदा तोच तीर ठाकरे यांनी भात्यातून काढलेला आहे. यावेळी तो चालेलच असे ठामपणे सांगता येत नाही.
मविआमध्ये ठाकरेंची घुसमट होते आहे, त्यामुळे ते ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा प्रकारचे चित्र निर्माण करणाऱ्या बातम्या गेल्या काही दिवसात वाचायला, ऐकायला मिळतायत. अशा बातम्या आकाशातून पडत नाहीत. त्यांचा स्त्रोत चेहराहीन असला तरी तो कुणीतरी आतला आणि महत्वाचा माणूस असतो. थोडं मागे गेले तर हे राजकारण समजणे
कठीण नाही. प्रवक्ते संजय राऊत यांचे माध्यमांशी अत्यंत उत्तम संबंध आहेत. हे संबंध कसे वापरायचे याचे ज्ञानही त्यांना आहे. सध्या ज्या बातम्या चालवल्या जात आहेत त्या मागे राऊत आहे की आणखी कोण? परंतु जो कोणी आहे तो मुरलेला गडी आहे.
हे ही वाचा:
सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमधून क्लीनचीट
वक्फ विधेयक बैठकीत टीएमसी खासदाराने बाटली फोडली
क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणाच्या आखाड्यात राज ठाकरे यांच्या तुलनेत उशीरा उडी घेतली असली तरी त्यांना राजकारणाचे डावपेच अधिक कुशलतेने खेळता येतात. याचा अनुभव राज यांनीही घेतलेला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर पुढचा काही काळ उद्धव आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे अशी चर्चा सुरू झाली होती. शिवसैनिक त्यासाठी प्रयत्नशील होते. अनेक ठिकाणी तसे बॅनर कटआऊट लागत होते. मातोश्रीवर नियमित उठबस असलेला एक ज्येष्ठ शिवसैनिक मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना भेटला. उद्धव आणि राजसाहेब एकत्र आले पाहिजेत. मातोश्रीवर सुद्धा असेच वातावरण आहे. तुम्ही एकदा उद्धव साहेबांची भेट घ्या, असे त्या शिवसैनिकाने देशपांडे यांना सुचवले. देशपांडे प्रस्ताव घेऊन राज ठाकरेंकडे पोहोचले. राज हे उद्धवना चांगलेच ओळखून असल्यामुळे ते देशपांडेंना म्हणाले, की काहीही होणार नाही. काही होईल असे तुला वाटत असेल तर तू प्रयत्न करून पाहा. त्या शिवसैनिकाने प्रचंड भरीस घातल्यामुळे देशपांडे ठाकरेंना जाऊन भेटले. प्राथमिक चर्चा झाली. नंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकरही जाऊन भेटले. उद्धव ठाकरेंनी
सांगितले की मी राज ठाकरेंना फोन करतो. हा फोन कधी आलाच नाही.
मनसे नेत्यांना नंतर कळले की, निवडणुका समोर असताना मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. ते प्रत्यक्षात येऊ नये. म्हणून ठाकरेंनी चर्चेचे हे गुऱ्हाळ सुरू केले होते. त्यांना राज ठाकरेंना सोबत घेण्यात काहीही रस नव्हता. उद्धवना फक्त राज ठाकरेंना भाजपापासून दूर ठेवायचे होते. ठाकरेंचे राजकारण हे असे कुटील आहे. तिथे भावनांना काडीचेही स्थान नाही. हवे ते खायला मिळत असेल तर ते कोणाच्याही पंक्तीला बसू शकतात. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत येणार या कंड्या याच प्रकारच्या आहेत. मविआमध्ये ठाकरेंची घुसमट होते आहे ही बाब सत्य आहे. मुख्यमंत्री पद तर दूर राहिले, शंभर जागांसाठी उबाठा शिवसेनेला घाम गाळावा लागतो आहे. भाजपा सोबत असताना सव्वाशे जागा लढवणारे ठाकरे आता शंभरी गाठण्यासाठी धापा टाकतायत. या मजबूरीतून या चर्चेने जन्म घेतला आहे.
ही चर्चा काँग्रेसच्या गोटात खळबळ निर्माण करण्यासाठी पेरण्यात आलेली आहे. समस्या एवढीच आहे की टायमिंग चुकले आहे. एका बाजूला महायुतीचे जागा वाटप जवळजवळ पूर्ण झालेले आहे. त्यामुळे ठाकरे-फडणवीस यांची भेट झाली असली नसली तरी निवडणुकीच्या पूर्वी आता इथून तिथे उड्या मारण्याची वेळ निघून गेलेली आहे. उबाठा शिवसेना सोबत नसली तरी काँग्रेसला विशेष फरक पडणार नाही. तरीही ठाकरे हा डाव टाकतायत, कारण काँग्रेसवर जमेल तितका दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपाचे नेते याबाबत फार काही बोलताना दिसत नाहीत. कारण त्यांना मविआमध्ये जमेल तेवढा गोंधळ आणि अविश्वास निर्माण करायचा आहेच. एक बाब मात्र स्पष्ट आहे. २०१९ च्या निवडणुकांनंतर जे काही घडले त्याची कुणकुण फार जणांना नव्हती. काही पत्रकार आणि नेत्यांपुरता हा विषय मर्यादित होता. २०२४ च्या निवडणुकांनंतर काही पक्ष इथून तिथे अशाच उड्या मारतील असे लोक ठामपणे बोलताना दिसतायत. ठाकरेंनी जुना तीर चालवला आहे. परंतु त्याचा फार परीणाम होण्याची शक्यता नाही. काँग्रेसचे नेते ठाकरेंच्या चाली ओळखून चुकले आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)