दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार परिसरात रविवारी (२० ऑक्टोबर) सकाळी एक मोठा स्फोट झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) शाळेजवळ हा स्फोट झाला. स्फोटानंतर लगेचच धुराचे प्रचंड लोटही दिसून आले, याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.
स्फोटामुळे जवळपास उभ्या असलेल्या वाहनांच्या आणि घरांच्या काचाही फुटल्या आहेत. सीआरपीएफ शाळेजवळ अनेक दुकाने आहेत, त्यामुळे हा स्फोट सिलिंडरच्या स्फोटामुळे झाला असण्याची शक्यता आहे. दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार परिसरात सीआरपीएफ शाळेबाहेर स्फोट झाल्याची बातमी मिळाली. सकाळी ७.५० च्या सुमारास अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.
हे ही वाचा :
बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी एका संशयित आरोपीने मागितले एक कोटी
संविधानाविषयीच्या गैरसमजुतीत दडली देशापुढील महत्त्वाच्या समस्यांची पाळेमुळे
महायुतीची जागावाटपाची पहिली यादी कधीही जाहीर होणार!
स्फोटाचे मूळ कारण शोधण्यासाठी तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि त्याचा स्रोत कोणता हे सध्या स्पष्ट झालेले नाही. डीसीपी अमित गोयल म्हणाले की, तज्ज्ञांची टीम या घटनेची कसून चौकशी करत आहे. स्फोटाबाबतची परिस्थिती लवकरच स्पष्ट होईल. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
इंडीया टुडेच्या बातमीनुसार, पोलिस स्फोटक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवणार आहेत. घटनास्थळाची चौकशी करत असताना, दिल्ली पोलिसांना स्फोट झालेल्या शाळेच्या भिंतीजवळ एक पांढरा पावडरसारखा पदार्थ सापडला आहे. घटनाक्रम निश्चित करण्यासाठी आणि स्फोटाचे कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहेत.