ओएनजीसीने २०२० मध्ये पश्चिम बंगालमधील अशोकनगर इथे शोधलेल्या तेलसाठ्यांतून उत्पादन घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट (डब्ल्यू.टी.आय) या सर्वोत्तम मानकाच्या तोडीचे हे तेल असल्याचे आता समोर आले आहे.
पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अशोकनगर-१ येथून काढण्यात आलेल्या तेलाचा एपीआय ४०-४१ एवढा असल्याचे सिद्ध झाले आहे. या दर्जाच्या तेलाचे शुद्धीकरण करणाऱ्या कारखान्यांवर कमी ताण पडतो.
ब्रेंट क्रुड जगातील उत्तम दर्जाचे तेल मानले जाते. त्याची घनता ८३५ कि.ग्रॅ/घनमीटर एवढी आहे, तर त्याचा एपीआय ३८.०६ इतका कमी आहे. डब्ल्यु.टी.आय. चा ए.पी.आय. ३९.६ अंश इतका आहे.
ए.पी.आय. हे तेलाच्या गुणवत्तेचे मानक आहे. ‘अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट’ ने प्रसृत केलेल्या या मानांकनात तेलातील विविध उत्पादनांची घनता मोजली जाते. साधारणपणे ३५ ते ४५ या दरम्यान ए.पी.आय. असल्यास ते हलके तेल मानले जाते. जास्त ए.पी.आय. असल्यास तेलाची घनता कमी असल्याचे प्रतिक आहे. ब्रेंट क्रुडची किंमत $५१.८० प्रति बॅरल एवढी आहे, तर डब्ल्यु.टी.आय. च्या क्रुडची किंमत $४८.५२ प्रति बॅरल आहे.
खनिज तेलाचा दर्जा त्यातील सल्फर संयुगाच्या प्रमाणावर ठरतो. अधिक प्रमाणात सल्फर असलेले खनिज तेल कनिष्ठ दर्जाचे मानले जाते, आणि त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत देखील अतिशय स्वस्त आहे. याउलट कमी सल्फर संयुग असलेले तेल उच्च दर्जाचे मानले जाऊन, त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळते. पश्चिम बंगालमधील तेलातील सल्फरचे नक्की प्रमाण अजू कळले नसले, तरी ते कमी असण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे या तेलाला उच्च दर्जा प्राप्त होऊन, ते स्वीट क्रुड या नावाने ओळखले जाऊ शकेल.
भारतामध्ये तेलाचे उत्पादन सर्वाधिक प्रमाणात बॉम्बे हायमधून केले जाते. त्यासोबतच पश्चिम आशियाई देशांतून म्हणजेच इराण आणि सौदी अरेबियातून तेल आयात केले जाते. भारत नायजेरिया, व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडूनही तेलाची आयात करतो.
भारताच्या एकूण गरजेच्या केवळ १५ टक्के तेलाचे उत्पादन देशांतर्गत साठ्यांतून होते. त्यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल खरीददार देश आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०२२ पर्यंत तेलाची आयात दोन-तृतीयांश तर तीच २०३० पर्यंत अर्ध्यावर आणण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
सध्या अशोकनगर येथील तेल विहिरीतून कमी प्रमाणात तेल उत्पादन होत असले तरी, अशोकनगर येथे तेलाचे अधिक मोठे साठे उपलब्ध असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या महिना अखेरपर्यंत ओएनजीसी दुसरी तेल विहिर खणण्याच्या तयारीत आहे.