नासाच्या चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेल्या पहिल्या मोहिमेतील (अपोलो ११) अंतराळवीर मायकल कॉलिन्स यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले, असे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले. तत्पुर्वी त्यांनी दीर्घकाळ कँसरशी लढा दिला होता. त्यांच्या मृत्युबद्दल विज्ञान जगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मायकल कॉलिन्स यांच्या मृत्युनंतर बझ ॲल्ड्रिन हे या मोहिमेतील शेवटचे जीवंत अंतराळवीर आहेत.
मायकल कॉलिन्स हे नासाच्या पहिल्या चांद्रमोहिमेतील (अपोलो ११) एक अंतराळवीर होते. ते या मोहिमेतील कमांड मोड्युलचे वैमानिक होते. ज्यावेळी २० जुलै १९६९ रोजी त्यांचे मित्र नील आर्मस्ट्राँग आणि बझ ॲल्ड्रिन हे खाली चंद्रावर पहिले पाऊल टाकत होते, त्यावेळी कॉलिन्स चंद्राभोवती कमांड मोड्युलमध्ये बसून फेऱ्या मारत होते.
त्यांना बऱ्याचदा ‘विसरलेला माणूस’ (Forgotten Man) म्हटले जाते. ज्यावेळी ते चंद्राच्या मागच्या बाजूला जात त्या प्रत्येक वेळी त्यांच्या ह्युस्टन मिशन कंट्रोलशी असलेला संपर्क तुटत असे. त्यांना २००९ मध्ये अपोलो ११ च्या वेळी केलेल्या कामाबद्दल खूप प्रेम वाटत असल्याचे सांगितले होते.
हे ही वाचा:
“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स
कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ
लसीकरण केंद्रावरील गर्दी कधी ‘ब्रेक’ होणार?
टाटा स्टीलचे ऑक्सिजन उत्पादन ८०० टन प्रतिदिनांवर
कॉलिन्स यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९३० रोजी रोम येथे झाला. त्यांचे वडिल अमेरिकेच्या सैन्य दलात मेजर जनरल होते. त्यांनी त्यांच्या वडिलांप्रमाणेच वेस्ट पॉईंट, न्यु यॉर्क येथील मिलिट्री ॲकॅडमिमध्ये प्रवेश घेतला आणि १९५२ मध्ये पदवी मिळवली.
बहुतांशी पहिल्या पिढीच्या अंतराळवीरांप्रमाणेच कॉलिन्स यांनी देखील अमेरिकी हवाई दलात टेस्ट पायलट म्हणून सुरूवात केली होती.
१९६३ मध्ये नासाकडून त्यांची अंतराळवीर म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी शीतयुद्धात आघाडी घेण्यासाठी आणि जॉन एफ. केनेडी यांनी चंद्रावर मानव उतरवण्याची घेतलेली शपथ पुर्ण करण्यासाठी नासा शर्थीचे प्रयत्न करत होती.
कॉलिन्स यांनी अपोलो मोहिमांची तयारी म्हणून केल्या गेलेल्या जेमिनी मोहिमांमधून अवकाश भ्रमणाला सुरूवात केली. ते जेमिनी १० या मोहिमेचे वैमानिक होते.
त्यांची दुसरी आणि अखेरची अवकाश भेट थेट ऐतिहासिक अपोलो ११ या मोहिमेच्या रुपाने झाली. त्यावेळेत ते प्रत्यक्ष चंद्रावर न उतरता केवळ चंद्राच्या बाजूला फेऱ्या मारणाऱ्या कमांड मोड्युलचे वैमानिक होते.
पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांपासून दूर राहणे पसंत केले होते. नंतर ते नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे संचालक बनले होते. त्यापदावरून ते १९७८ मध्ये पायउतार झाले.
त्यांच्या अपोलो ११ च्या अनुभवांवर आधारित चरित्र लिहीले गेले आहे. त्याबरोबरच त्यांनी अवकाशाशी संबंधित अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.