भारतातील सर्वात श्रीमंत देवालय म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान ओळखले जाते. अस्सल देशी तुपातला बुंदीच्या लाडूचा प्रसाद इथून लौकीकास प्राप्त झाला. पुढे त्याचा प्रवास शिर्डी, गणपतीपुळे ते सिद्धिविनायक असा झालेला दिसतो. या लाडवांवरून आंध्र प्रदेशचे राजकारण प्रचंड तापलेले आहे. लाडवांमध्ये जनावरांच्या चर्बीचा वापर झाला असा खळबळजनक आरोप आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे. जितक्या त्वेषाने नायडू हा आरोप करीत आहेत, तितक्याच त्वेषाने वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी तो फेटाळला आहे. दक्षिणेतील राज्यातील दोन प्रादेशिक पक्षांचे नेते, त्यापैकी एक धर्मांतरीत, परंतु हे दोघेही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समोरासमोर उभे ठाकलेले दिसतात. दक्षिणेतील भूमी हिंदुत्वासाठी किती पोषक बनली आहे, त्याची ही निव्वळ झलक आहे.