आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ संदिप घोष यांना अटक करण्यात आल्यानंतर ८ दिवसांच्या सीबीआय कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) डॉ संदिप घोष यांच्यासह अन्य तिघांना अटक केली होती. बिप्लव सिंघा, सुमन हाजरा आणि अफसर अली खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोलकाता येथील विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी (३ सप्टेंबर) चारही आरोपींना आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.
चारही आरोपींना १० सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआयने सर्व आरोपींना १० दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने केवळ आठ दिवसांची कोठडी मंजूर केली. याव्यतिरिक्त, अटक करण्यात आलेल्या अफसर अली खानने जामीन अर्ज सादर केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला.
डॉ. संदिप घोष बिप्लव सिंघा, सुमन हाजरा आणि अफसर अली खान यांना हॉस्पिटलमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती , ज्यात आर्थिक गैरव्यवहार आणि हॉस्पिटलच्या संसाधनांचा गैरवापर केल्याच्या आरोपांचा समावेश आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) डॉ संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित केले आहे. बलात्कार-हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेणाऱ्या आयएमएच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला आहे.