महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. डीआरआय पथकाने मुंबई सेंट्रल येथे कारवाई करत २३ किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने कारवाई करत २३ किलो सोने जप्त केले, ज्याची बाजारात १७ कोटी इतकी किंमत असल्याची माहिती आहे. हे सोने गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे नेले जात असताना पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पायल जैन (३९), पंखुदेवी माली (३८), राजेश कुमार जैन (४३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील पंखुदेवी हा भुलेश्वर येथील रहिवासी आहे, तर पायल व राजेश दोघेही मुंबई सेंट्रल येथील रहिवासी आहेत. आरोपी राजेश व त्याचा साथीदार रमेश यांच्या सांगण्यावरून तिघेही फणसवाडी येथून सोने घेऊन मुंबई सेट्रल येथील घरी ठेवण्यासाठी घेऊन जात होते.
हे ही वाचा :
गोरेगावमध्ये हिट अँड रन; अल्पवयीन चालकाच्या गाडीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
राजकोट किल्ला दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक
मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच नाही!
‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला सुरुवात
याबाबत डीआरआय पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार डीआरआय पथकाने सापळा रचत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची झडती केली असता २२.८९ किलोग्रॅम तस्करी केलेले सोने सापडले. यासह तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीच्या उत्पन्नाचे ४० लाख रुपये घरात लपवले होते. ती रक्कमही पथकाने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत १६ कोटी ९१ लाख रुपये असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध सीमा शुल्क कायदा १९६२ च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.