बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थीनीवर झालेल्या लैगिंक अत्याचार प्रकरणात बदलापूर पोलिसांनी दाखल केलेल्या पोक्सोच्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) शाळा व्यवस्थापनाला सह आरोपी करण्यात आले आहे.पोक्सो कायद्यात असणाऱ्या तरतुदीनुसार शाळा व्यवस्थापन मंडळाला या गुन्हयात सह आरोपी बनविण्यात आले आहे.
बदलापूर येथील प्रतिष्ठित असणाऱ्या शाळेत १२ आणि १३ ऑगस्ट रोजी छोटा शिशुमध्ये शिकणाऱ्या दोन ४ वर्षाच्या विद्यार्थ्यांनीवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने शाळेतील स्वच्छतागृहात लैगिंक अत्याचार केला होता. ही बाब १५ ऑगस्ट रोजी पालकांच्या लक्षात आली होती,मुलींना लघवीच्या जागेवर त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले त्या वेळी ही बाब उघडकीस आली होती. दुसऱ्या एका पालकाने ही बाब १३ ऑगस्ट रोजीच
शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आणून दिली होती. परंतु शाळा प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणीत हे स्पष्ट झाले की तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला होता.
१६ ऑगस्ट रोजी एका विद्यार्थीनीचे पालकांनी तक्रार दाखल करण्यासाठी बदलापूर पोलीस ठाणे गाठले, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून न घेता तब्बल १२ तासांनी शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचार तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद बदलापूर मध्ये उमटले आणि २० ऑगस्ट रोजी बदलापूरवासियांनी आंदोलन करून शाळेची तोडफोड त्यानंतर १० तास रेलरोको केला होता.बदलापूर आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. लैगिंक अत्याचार आणि पोक्सो या गुन्ह्याचा तपासासाठी विशेष तपास पथकाची राज्य शासनाने घोषणा करून हा एक गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
नेपाळ : भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, १४ जणांचा मृत्यू !
पूर्व द्रुतगती महामार्गावर मोटार झाडावर आदळली, दोन ठार
मुख्यमंत्र्यांनी केली उद्धव ठाकरेंची पोलखोल, कोर्टाची कॉपीच दाखविली !
पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!
विशेष तपास पथकाचे नेतृत्व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह करीत असून आरती सिंह या अधिकारी यांनी दोन्ही पीडित मुलीच्या पालकांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. दरम्यान पोक्सो कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार विद्यार्थीनीवर ओढवलेल्या प्रसंगाबाबत शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर देखील त्यांनी तात्काळ ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून न दिल्यामुळे विशेष तपास पथकाने शाळा व्यवस्थापन मंडळाला या गुन्ह्यात सह आरोपी केले आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक आणि राज्य बालहक्क आयोगाचे (सीआरसी) अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्राथमिक चौकशी केली. सूत्रांनी सांगितले की, या चौकशीदरम्यान, प्राचार्याने पुष्टी केली की, तिने विश्वस्तांना घटनेची माहिती मिळताच कळवले होते, परंतु पुढील कारवाई झाली नाही. ट्रस्टीच्या राजकीय संबंधांमुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास विलंब केला आणि त्रासलेल्या पालकांना पळवून लावले, असेही सूत्रांनी सांगितले. समितीचा अहवाल येत्या एक-दोन दिवसांत सार्वजनिक होण्याची शक्यता आहे.