मराठा आरक्षणाचा वाद अजूनही मिटलेला नाही. मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणावर महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणावर विरोधक मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप महायुतीच्या मंत्र्यांनी केला. विरोधकांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान, याच मागणी करिता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर धडकले.
मनोज जरांगे मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून राजकीय भाषा बोलत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मनोज जरांगे केवळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट करून महाविकास आघाडीच्या शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वड्डेटीवार, नाना पाटोले, या नेत्यांबद्दल मनोज जरांगे यांनी ब्र शब्द देखील काढले नसल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या भूमिकेवर मविआच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले.
मात्र, विरोधकांच्या एकही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ‘ ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत विरोधकांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन करण्याचे ठरवले. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाचे कार्यकर्ते काल उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांची भेटही घेतली नाही , शिवाय त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
हे ही वाचा:
विक्रमवीर विश्वेश लेले यांचा गौरव !
नवाब मालिकांना उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर
डॉ. अंजनाताई कुलकर्णी यांचे निधन
वायनाडमध्ये भूस्खलन; शेकडो लोक अडकल्याची भीती, ११ जणांचा मृत्यू
यावर आक्रमक झालेल्या ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर मोर्चा काढला. मराठा समाजाच्या आरक्षणावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच विरोधक असलेल्या प्रत्येक नेत्यांच्या बंगल्यावर जाऊन आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांचीही भूमिका जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.