कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करतांना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचे देखील स्मरण केले. आज २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, सैनिक कधीही माजी होत नसतो. याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच त्याच्या कल्याणासाठी आम्ही महत्वाचे निर्णय घेतलेत..शासनाने माजी सैनिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. खारघर इथं माजी सैनिकांचं विश्रामगृहही उभ करणार आहोत. मेस्कोचे विविध उपक्रम, माजी सैनिकांना रोजगार संधी, त्यांच्या वेतनातील तफावती दूर करणार आहोत. मुंबईमध्ये युद्ध संग्रहालय करण्याचा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यातल्या अपशिंगे मिलीटरी गावातील विकास कामांना प्राधान्य देण्याचं ठरवलंय. माजी सैनिकांना टोलमधून सवलत आणि असे अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत.
हेही वाचा..
खलिस्तानी खासदार अमरीपाल सिंगच्या समर्थनावरून काँगेसचे घुमजाव !
रशिया- युक्रेन युद्धाचे सावट ऑलिम्पिकवर; रशियाच्या सहभागावर बंदी!
अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजातून १४ क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका
आजही कुठलीही आपत्ती आली की आपल्याला सैन्य दलातील आपल्या जाँबाज जवानांची आठवण येते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सीमेचं रक्षण असो की आपल्या परिसरातील गंभीर आपत्ती आपल्या अंतर्गत बचाव पथकांसोबत या जवानांची लष्कर, हवाई आणि नौदलाची साथ मिळाली की आपल्याला आणखी धीर येतो. इतका विश्वास सैन्य दलातील जवानांवर, त्यांच्या हिमंतीवर ठेवतो. वीर जवानांच्या कुटुंबांची काळजी घेण्यासाठी येत्या काळात आणखी काही महत्वाचे निर्णयही आपण घेणार आहोत असेही ते म्हणाले.
आपला महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. शिवछत्रपतींना देशाला स्वाभिमान आणि धर्म-देव-देवळांच्या रक्षणाचा धडा घालून दिलाय. हाच वारसा घेऊन आमचे सरकार काम करते आहे. देशाच्या सीमेचं रक्षण करणारे जवान आणि त्यांच्या कल्याणासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. हे आमचं कर्तव्य आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.