मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २०१३ मधील आर्थिक व्यवहाराप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरोधात पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मनोज जरांगे वारंवार गैरहजर झाल्याने वॉरंट जारी झाले आहे. धनंजय घोरपडे यांनी मनोज जरांगे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये धनंजय घोरपडेंच्या ‘शंभूराजे’ या नाटकाच्या ६ प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्त बहिर यांच्याकडून हे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक प्रयोगाला ५ लाख या प्रमाणे ३० लाख रुपये देण्याचे आयोजकांनी कबूल केले होते, असा दावा धनंजय घोरपडे यांनी केला आहे. मात्र, प्रयोगाचे पूर्ण पैसे मिळाले नसल्याची धनंजय घोरपडेंची तक्रार आहे. प्रयोगाचे पैसे न मिळाल्याने घोरपडेंनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले. जरांगे पाटील तारखेला वारंवार गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पूजा खेडकरने आयएएस प्रशिक्षण केंद्राचा आदेश धुडकावला; अंतिम मुदत उलटूनही गैरहजर
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत असतानाचं जाणवला भूकंपाचा धक्का
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली मुदतवाढ
ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालन्यात पुन्हा एकदा उपोषण सुरु केले होते. परंतु, तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.