पुण्यातील ससून रुग्णालय हा देशभरात सध्या चर्चेचा विषय बनला असून गेल्या काही दिवसांपासून या रूग्णालयातील अनेक धक्कादायक प्रकरण समोर येत असतात. अशातच आता आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सामाजिक संस्थांकडून बेवारस तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी आणले जात असताना अशा रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून बेवारस ठिकाणी सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील आदी कुमार या डॉक्टराला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे. जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा:
‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब
अर्थसंकल्पात आदिवासींसाठी ‘प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान’
‘मोदी 3.0 सरकार’च्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी १.५२ कोटी
ससून रुग्णालयात निलेश नावाचा मध्यप्रदेश येथील ३२ वर्षाचा रुग्ण उपचारांसाठी दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार झाले शिवाय त्याच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला. पण, शस्त्रक्रिया झालेल्या या रुग्णाला काही दिवसात निवासी डॉक्टरांनी ऑटो रिक्षामध्ये बसत येरवड्याच्या एका निर्जन स्थळी सोडून दिले.