देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज म्हणजेच मंगळवार २३ जुलै रोजी संसदेत मांडला जाणार आहे. मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून याकडे देशासह साऱ्या जगाचे लक्ष असणार आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता मांडतील. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे सर्वांचे डोळे आहेत.
यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष असल्यामुळे निवडणुकीपूर्वी अर्थमंत्र्यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. यानंतर देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या असून देशात एनडीए सरकार स्थापन झालं आहे. याचं सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवार, २२ जुलैपासून सुरुवात झाली. हे अधिवेशन २२ जुलैपासून १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प हा २०४७ च्या विकसित भारताचा पाया असेल असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी केलं. त्यामुळे सामान्यांनाही या अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे त्यामुळे या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना”
२०२५ च्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ६.५ ते ७ टक्के राहणार
देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले
“ओबीसी आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत”
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विक्रम
२०१९ मध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून धुरा हाती घेतली. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आले आहेत. या टर्ममध्येही निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ खाते आहे. त्यामुळे २०१९ पासून सीतारमण यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत, ज्यात या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचाही समावेश आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात येणारा पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असणार आहे. असे करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री असतील. यापूर्वी मोरारजी देसाई यांनी पाचवेळा नियमित तर एकदा अंतरिम बजेट सादर केले आहे. ते १९५९ ते १९६४ या काळात अर्थमंत्री होते.