भाजपाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनाच आता आमदार होण्याची ऑफर दिली आहे.
मध्यंतरी प्रसाद लाड यांना जरांगे यांनी शिवीगाळ केली होती. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लाड यांच्यावर वैयक्तिक शेरेबाजी केली होती त्याशिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी अत्यंत असभ्य भाषेत टीका केली होती. जरांगे यांनी फडणवीसांसोबतच प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना लक्ष्य केलेले आहे. त्यानिमित्ताने लाड यांनी जरांगेंना ऑफर दिली.
लाड म्हणाले की, तुम्ही टीका केली म्हणून मी आपल्यावर टीका करत नाही. लहान भाऊ म्हणून छोटसं मार्गदर्शन करतो. आपल्याला योग्य वाटलं तर आपण ते स्वीकारावं ही माझी आपल्याला विनंती आहे. भाऊ, आपण म्हणालात की, ही योजना चुकीची आहे. मला वाटतं की, जवळजवळ तीन कोटी महिला भगिनी, मातांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दीड-दीड हजार असे तीन हजार एका घरात जाणार आहेत. आपण मराठवाड्यात आहात. आम्ही शहरात राहतो. आम्हाला गावची जास्त माहिती नसते. एका गावच्या महिलेच्या घरी तीन हजार रुपये गेले, तर तिचा अख्खा महिना हा सुंदर सुखी जाऊ शकतो.
हे ही वाचा:
फेक नरेटिव्हचा रावण, मारू नाभीत बाण, चढू सत्तेचा सोपान!
अफगाणींचा पाकिस्तानी दूतावासावर हल्ला, पाकचा ध्वज उतरवला !
फ्लाईटमध्ये विनयभंग; जिंदाल स्टीलच्या सीईओला गमवावी लागली नोकरी !
केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू !
लाड यांनी सांगितले की, मला वाटतं तुम्ही राजकारणापासून थोडं अलिप्त राहिलं पाहिजे. आपण म्हणता की, प्रसाद लाड, प्रविण दरेकर राजकारण करतात. राजकारण आमचा पिंड आहे. पण, समाजकारण हे आमचं ध्येय आहे. लाड यांनी आवाहन केले की, तुम्ही समाजकारणपासून राजकारणापर्यंत जाऊ नका. जर तुम्हाला खरंच राजकारणात यायचं असेल, तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे. सभागृहात या. सभागृहात चर्चा करा. नाही तर मला चर्चेला बोलवा.”
लाड यांनी ऑफर दिली की, भाऊ, माझी विनंती तुम्ही मान्य करा. एकदा तरी तुम्ही मला चर्चेला बोलवा. नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या. मी आणि प्रविण दरेकर राजीनामा देतो. आपण, आपले सहकारी सभागृहात या. ठामपणे आपला मुद्दा सभागृहात मांडा. आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत.