मुस्लीम मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत एकगठ्ठा मते देशभरात इंडी आघाडीच्या पारड्यात टाकली. महाराष्ट्रात मविआची सरशी झाली त्यात या मतांचा मोठा हात आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मुद्दा ऐरणीवर येणार हे नक्की. तशी कुजबुज पुन्हा सुरू झालेली आहे. मुस्लिमांना लोकसंख्येच्या तुलनेत जागा हव्या, असा दावा काँग्रेसच्या बुजुर्ग नेत्याने केलेला आहे.
मुस्लीम समाज शैक्षणिक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असला तरी राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे असलेले शहाणपण भारतात दुसऱ्या कोणाकडेही नाही. लोकसभेत केलेल्या मतदानाची किंमत वसूल करण्याचे संकेत मुस्लीम समाजाने दिले आहेत.
निवडणुकीच्या काळात मुस्लिमांनी महायुतीच्या विरोधात एकगठ्ठा मतदान केले. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मतदार संघातील ही आकडेवारी देऊन व्होट जिहाद नावाचे अभियान सोशल मीडियावर चालवले होते. मुळात या शब्दाचे मातृत्व सलमान खुर्शीद यांची पुतणी मारीया आलम खान हिच्याकडे जाते. भाजपाच्या विरोधात त्यांनीच वोट जिहादची हाळी दिली होती. तो जिहाद प्रत्यक्षात आला असल्याचे फक्त सोमय्या यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.
विशाळगडावरील अनधिकृत बांधकामांचा विषय पेटल्यानंतर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लीमांनी दोन दोन तास उन्हात उभे राहून मतदान केल्याची आठवण मविआच्या नेत्यांना करून दिली. लोकसभा निवडणुकीच्या काळात मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिले नसल्याबाबत काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. वेळप्रसंगी हिंदूंवर वरवंटा चालवून आपले हित पाहणाऱ्या आघाडीला मोठा विजय मिळाला म्हणून मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये मोठा जल्लोष झाला. परंतु तेवढे पुरेसे नाही. विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना मतांची किंमतपणे वसूल करायची आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांचा टक्का ११.५ आहे. त्यांना विधानसभेच्या ३२ जागा मिळायला हव्या असा दावा राज्यसभेचे माजी खासदार काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलेला आहे.
लोकसत्तामध्ये लिहिलेल्या एका लेखात दलवाई यांनी ही मागणी केलेली आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांना देता येतील असे ४० मतदार संघ असल्याचे पत्र दहवाई यांनी यूपीएच्या कार्यकाळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिले होते. परंतु त्यावेळी काँग्रेसने बहुधा ते केराच्या टोपलीत टाकले असावे. ४० जागा नाही तर किमान २० तरी द्या, असे मत दलवाई यांनी व्यक्त केलेले आहे.
हे प्रतिनिधित्व कोण देणार? भाजपावर ही जबाबदारी येत नाही. कारण मुस्लीम भाजपाला मत देत नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही देत नाहीत. मतं देतात उबाठा शिवसेनेला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला. भाजपाने मुस्लीम उमेदवार दिले तरी मुस्लीम समाज त्यांना मत देत नाही. हे उमेदवार पाडले जातात. त्यामुळे मुस्लिमांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, अशांनी हे प्रतिनिधित्व द्यायला हवे. उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने घातलेली साद मुस्लीम मतदारांनी मनावर घेतली. त्यांच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह गोठवले !
पश्चिम त्रिपुरामध्ये १९७१ च्या भारत-पाक युद्धातील २७ मोर्टारचे गोळे सापडले !
पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याबद्दल इटालियन पत्रकाराला ४.५ लाखांचा दंड
आता जरांगेंचा तोल पूर्ण सुटलाय!
विशाळगडावर जेव्हा अतिक्रमणांवर हातोडा चालवला जात होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विशाळगडावर जावे, तिथल्या लोकांना धीर द्यावा, असा सल्ला पत्रकार निखिल वागळे यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर मविआच्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी ज्या पत्रकारांचे नाव घेऊन आभार मानले त्यात निखिल वागळे यांचेही नाव होते. ठाकरेंच्या लोकसभेतील विजयात वागळेंचा सुद्धा हातभार आहे हे ठाकरेंनी मान्य केले. त्यामुळे त्यांना ठाकरेंना सल्ला देण्याचा नैतिक अधिकार निश्चितपणे आहे. उद्धव ठाकरे यांनी हा सल्ला आतापर्यंत तरी मनावर घेतलेला नाही.
ठाकरे यांचे विशाळगडावर जाणे तेवढे महत्वाचे नाही जेवढे त्यांनी दलवाईंचे म्हणणे मनावर घेणे महत्वाचे आहे. दलवाई समजूतदार नेते आहेत. ते ४० जागांवर अडून बसलेले नाहीत. ४० देता येत नसतील तर किमान २० जागा मुस्लिमांना द्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. मला उमेदवारी द्या, असेही ते कुठे म्हणालेले नाहीत. त्यांनी फक्त मुस्लीम समाजासाठी आवाज उठवलेला आहे. मविआतील तीन पक्षांनी प्रत्येकी ७-७ मुस्लिमांना उमेदवारी दिली तरी हा आकडा गाठता येईल. मविआची सत्ता आल्यानंतर शरद पवार म्हणाले होते की, आम्ही मुस्लीम मतांमुळे सत्तेवर आलो. २०२४ च्या निवडणुकीनंतर मुस्लीमांनाही असे म्हणण्याची संधी द्या की मविआमुळे आमचे २१ उमेदवार विधानसभेत गेले. उरलेले १९ उमेदवारांना विधान परीषद निवडणुकीत संधी देता येईल.
भाजपा मुस्लीम विरोधी आहे, असा दावा करणाऱ्या मविआच्या नेत्यांना हुसेन दलवाई यांनी संधी दिलेली आहे, की त्यांनी सिद्ध करावे की तेच मुस्लीमांचे खरेखुरे मसीहा आहेत. त्यांना मुस्लिमांची फक्त मतं नको, ते मुस्लिमांना सत्तेत भागीदारी देण्यासही तयार आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)