सर तन से जुदा… अशी चिथावणी देणाऱ्या अजमेर दर्ग्याचा खादीम गौहर चिश्ति याची अजमेर न्यायालयाने सुटका केली. चिश्तिच्या चिथावणीनंतर राजस्थानमध्ये कन्हैयालाल टेलर, महाराष्ट्रात उमेश कोल्हे यांचे गळे चिरून त्यांना ठार करण्यात आले होते. जवळचे मित्र म्हणवणाऱ्या कडव्या मुस्लिमांनी या हत्या केल्या होत्या.
देशाची ओळख हिंदुस्तान असली तरी इथे हिंदूंचे मरण अत्यंत स्वस्त झालेले आहे. भाजपा माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबाबत २०२२मध्ये केलेल्या कथित विधानानंतर त्यांना देशभरातून धमक्या येत होत्या. कन्हैया आणि उमेश यांचे गळे चिरण्यात आले. हिंदूंचे गळे कापणाऱ्यांना चिथावणी देणे हा कोर्टाला गुन्हा वाटत नाही. कारण हिंदूंच्या जीवनाला या देशात किंमत नाही. हिंदू देव देवतांचे बिडंबन हे या देशात अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य असते, मात्र इतर धर्मातील सत्य सांगण्याचे स्वातंत्र्य मात्र तुम्हाला देशाची लोकशाही देत नाही.
जून २०२४ मध्ये सहा वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून खून करणाऱ्या शेख आसिफ अली या नराधमाला सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा ओडीशा उच्च न्यायालयाने रद्द केली. न्यायालयाला एका अश्राप अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या करण्याचा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा वाटला नाही. गुन्हेगार पाच वेळचा नमाजी असल्यामुळे त्याला फाशी ऐवजी जन्मठेप देण्यात आली. सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि तिचा खून करण्याचे अमानुष क्रौर्य नमाज पढण्यामुळे सौम्य झाले. धार्मिक बलात्काऱ्याला अभय देत न्या. एस.के.साहू आणि आर.के.पटनायक यांच्या खंडपीठाने हा मानवतापूर्ण निकाल दिला. दहशतवादाला धर्म नसतो, मात्र बलात्काराला असतो हे न्यायालयाने सिद्ध केले.
हे ही वाचा:
विशाळ गडावरील ९० हुन अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त !
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक
अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?
तुम्ही धर्माभिमानी हिंदू असाल तर कदाचित तुम्ही गुन्हेगार ठरू शकता. तुम्ही कट्टर मुस्लिम असाल तर मात्र न्यायालयाला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटू शकते. तुम्ही दहशतवादी असाल तर तुमच्यासाठी मध्यरात्री न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात. तुम्ही बलात्कारी असाल तर तुमच्या नमाजामध्ये तुमची शिक्षा कमी करण्याची ताकद येते. तुम्ही मौलाना असाल आणि हिंदूंना तुम्ही जिहादची धमकी दिली तरीही तुमच्यावर कारवाई होत नाही. कारण काफीरांच्या विरोधात ते त्यांचे धर्म कर्तव्य असते.
मुस्लीम मतांसमोर फक्त राजकीय नेते लोटांगण घालतात, असे नाही कट्टरतावादासमोर न्यायालयही नरमते. नुपूर शर्मा यांच्या त्या कथित विधानानंतर अजमेर दर्गासमोर सर तन से जुदा… ची घोषणाबाजी झाली. नुपूर यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर कन्हैयालाल आणि उमेश यांची गळे चिरून हत्या करण्यात आली होती. कन्हैयाची हत्या करणाऱ्यांनी तर हत्येचा व्हीडीयो सोशल मीडियावर टाकला. जणू मारेकरी हिंदू समाजाला बजावत होते, बघा तुमच्या वाट्यालाही हे येऊ शकते.
याचा अर्थ सर तन से जुदा… ही चिथावणी होती, हे चिश्ती आणि त्याच्या सहकाऱ्यांना ठाऊक होते. म्हणूनच घोषणाबाजीनंतर हा चिश्ती गायब झाला होता. त्याला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर दोन वर्ष तो तुरुंगात होता. अखेर न्यायालयाने त्याची सुटका केली. आणखी एका प्रकरणात जामीन मिळेपर्यंत तो तुरुंगात राहणार आहे. सर तन से जुदा… ची घोषणाबाजी आणि कन्हैया तसेच उमेश यांच्या हत्येचा काही संबंध नाही, असे आढळल्यानंतर चिश्ती याच्यासह सहा जणांना सोडण्यात आले.
चूक न्यायालयाची नाही. छत्रपती म्हणून मिरवणारे शाहू यांच्यासारखे बेगडी नेते जर एखाद्या शिवकालीन ऐतिहासिक गडावर बनलेल्या दर्ग्याला विरोध न करता, त्याच्या नुकसानीची पाहणी करायला जात असतील, शंकराचार्य म्हणून मिरवणारा बोगस इसम हिंदू समाजावरली संकटावर, अत्याचारांवर मौन बाळगून फक्त राजकीय कंडू शमवण्यासाठी रोज शेलकी आणि तद्दन खोटारडी विधाने करत असेल, ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणून मिरवणारे पक्ष मुस्लिमांच्या मतांकडे डोळे लावून बसले असतील तर न्यायालयाचा अपवाद कसा राहील. सगळ्यांचे चेहरे हिंदूविरोधाने काळवंडले असतील तर न्यायमूर्तीं हिंदूंवर कृपा कटाक्ष का टाकतील?
हिंदूंनी हे सगळं शांतपणे पाहिले पाहिजे, सहन केले पाहिजे, ५० वर्षांनंतर देशाची आणखी एक फाळणी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत, तोपर्यंत हातावर हात ठेवून सहन केले पाहिजे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)