शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. संजय राऊत यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असं तिला वाटतं. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले तर आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना खडसावले.
शिवसेना नेते अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. अनिल परब यांच्यावरही अनिल देशमुखांइतकाच गंभीर आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ऑन पेपर त्यांच्यावर हा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील
खरा सूत्रधार मंत्रालय सहावा मजला की सिल्वर ओक?
बंगळुरूमध्ये पुण्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस
पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला
याशिवाय, संजय घोडावत यांचीही केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेच्या पत्रात संजय घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे. मला थेट अजित पवार यांचं नाव घ्यायचं नाही. मी केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, एवढंच म्हणत आहे. काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.