पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवार, ९ जुलै रोजी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये भारतीय नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि रशिया यांच्यात असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला. भारत आणि रशियामधील संबंध नवीन उंचीला स्पर्श करत आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली होती, अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितली. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाच्या आक्रमणानंतर युद्धग्रस्त युक्रेनमधून सुमारे १७ हजारहून अधिक भारतीयांना विशेषतः विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध, १४० कोटी भारतीयांचे प्रेम घेऊन आलो आहे. तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर माझा भारतीय समुदायाशी पहिला संवाद येथे मॉस्कोमध्ये होत आहे, हे अतिशय आनंददायी आहे. एक महिन्यापूर्वी ९ जून रोजी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकदीने काम करेन,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
“आपल्या सरकारने जी उद्दीष्टे ठेवली आहेत त्यामध्ये तीन हा अंक सातत्याने दिसतो, हा एक योगायोगच आहे. माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचं आहे. देशातील गरिबांसाठी तीन कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य आहे. तसेच देशात तीन कोटी ‘करोडपती दिदी’ बनवायच्या आहेत. सर्वांनी पाहिलं आहे की, भारताने एखादं उद्दीष्ट ठेवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय भारत मागे हटत नाही. भारत तो देश आहे जो चांद्रयान चंद्राच्या अशा ठिकाणी पोहचवतो जेथे जगातला कुठलाच देश पोहोचला नाही. डिजीटल ट्रान्झॅक्शनच्या क्षेत्रातही भारत एक विश्वासार्ह देश बनला आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
“जगभरातील लोक हल्ली भारतात येतात तेव्हा म्हणतात की, भारत आता बदलू लागाला आहे. भारत बदलतो आहे कारण देशाचा आपल्या १४० कोटी नागरिकांवर विश्वास आहे. १४० कोटी भारतीयांनी आपल्या देशाला विकसित बनवण्याचं स्वप्न पाहिलं आहे आणि सर्वजण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. १४० कोटी भारतीय नागरिक प्रत्येक क्षेत्रात इतरांना मागे टाकून पुढे जाण्याची तयारी करत आहेत. भारताची अर्थव्यवस्था करोनाच्या संकटातून बाहेर पडली. शिवाय अर्थव्यवस्था जगातील विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवली आहे,” असं भाष्य नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केले आहे.
हे ही वाचा:
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
शरद पवार म्हणतात, शेतकऱ्यांना वीज मोफत कशाला?
‘काश्मीर टायगर्सने’ घेतली कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी !
भुलवून रशियन सैन्यात भरती केलेल्या भारतीयांची होणार सुटका
“भारत जी- २० सारख्या यशस्वी कार्यक्रमांचे आयोजन करतो, तेव्हा जग एका आवाजात बोलते, ‘भारत बदल रहा है’ जेव्हा भारताने केवळ १० वर्षांत आपल्या विमानतळांची संख्या दुप्पट केली, तेव्हा जग म्हणते, ‘भारत बदल रहा है’ जेव्हा भारत अवघ्या १० वर्षात ४० हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करतो तेव्हा जगालाही भारताच्या सामर्थ्याची जाणीव होते आणि जग म्हणते की, देश बदलत आहे,” असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.