विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ कोव्हिड रुग्णालयात एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन १३ जणांचा जागीच आणि उपचारादरम्यान दोघांचा अशा एकूण १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (शुक्रवार) सकाळी घडली होती. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि स्टाफविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ३०४, ३३७, ३३८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ३ जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु त्यांना सध्यातरी आरोपी ठरवण्यात आलेलं नाही.
याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन यामध्ये कुणाची काय भूमिका आहे, कुठे हलगर्जीपणा झाला, यात हॉस्पिटल प्रशासनाचा निष्काळजीपणा कुठे झाला, याबाबतचा पूर्ण तपास करून संबंधिताच्या भूमिकेप्रमाणे त्यांना आरोपी केलं जाईल, अशी माहिती मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त परिमंडळ ०२ चे पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे.
मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील काल (२३ एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून १५ जणांना प्राण गमवावे लागले. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांचे घर, कार्यालयासह, दहा ठिकाणी सीबीआयचे छापे
कोड्यात टाकणारा निर्णय…कलर कोड रद्द
सीबीआयने केला अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल
देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी मोदींचा संवाद
विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयू) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत.