जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागात सोमवार, ८ जुलै रोजी लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान, अजूनपर्यंत या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही. या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या काठूआ जिल्ह्यातील बिल्लावर भागातून लष्कराचे वाहन जात असताना अचानक या वाहनावर गोळीबार करण्यात आला. माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. शिवाय या दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडही फेकले. सुदैवाने या हल्ल्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच या भागाला सुरक्षा यंत्रणांकडून सर्व बाजूंनी घेरण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा:
“हिट अँड रन प्रकरणातील कुणालाही सोडणार नाही”
मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूममध्ये
पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद
इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !
यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात ११ आणि १२ जून रोजी दुहेरी दहशतवादी हल्ला झाला होता. ११ जून रोजी, चत्तरगल्ला येथील संयुक्त चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने सहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, तर १२ जून रोजी गंडोह भागातील कोटा शीर्षस्थानी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. हल्ल्यांनंतर, सुरक्षा दलांनी त्यांच्या दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या आणि जिल्ह्यात घुसखोरी करून कार्यरत असलेल्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. दरम्यान, २६ जून रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.