भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून १२५ कोटींची इनाम जाहीर करण्यात आले. त्यानंतर या खेळाडूंना प्रत्येकी किती पैसे मिळतील याबद्दल प्रत्येकाच्या मनात कुतुहल आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी विश्वविजेत्या संघाला १२५ कोटींचे इनाम जाहीर केले होते. १७ वर्षांनी भारतीय संघांने टी-२० वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर देशभरात या संघाचे कौतुक होत आहे. मुंबईत या संघाची विजयी मिरवणूकही निघाली आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद चाहत्यांनी दिला. या खेळाडूंना मिळालेले हे १२५ कोटींचे इनाम कसे वितरित केले जाईल, याबद्दल लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत.
भारतीय संघातील १५ खेळाडूंना या बक्षिसाच्या रकमेतील प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळतील. तर संजू सॅमसन, यजुर्वेंद्र चहल हे खेळाडू प्रत्यक्ष संघात खेळले नसले तरी त्यांनाही ५ कोटी रुपये मिळणार आहेत. तर रिंकू सिंह, शुभमन गिल, आवेश खान, खलिल अहमद या राखीव खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये मिळतील. तर वरिष्ठ निवड समिती सदस्यांना प्रत्येकी १ कोटी मिळतील. एकूण ५ जणांची ही समिती आहे. त्यांचे प्रमुख अजित आगरकर आहेत.
हे ही वाचा:
पुण्यात हिट अँड रनची आणखी एक घटना, गस्तीवर असलेल्या हवालदाराला कारने चिरडले!
सर्वोच्च न्यायालयाची ममता सरकारला पुन्हा चपराक
राज्य शासनाच्या प्रचार प्रसार समन्वयकपदी डॅा. ज्योती वाघमारे यांची नियुक्ती
नरेंद्र मोदी ४१ वर्षांनी ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाणारे ‘पंतप्रधान’
भारतीय संघातील इतर कर्मचाऱ्यांनाही भरघोस रक्कम मिळणार आहे. फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाऊन स्पेशालिस्ट, दोन मसाजर, कंडिशनिंग कोच यांना प्रत्येकी २ कोटी मिळतील. भारतीय संघासोबत असलेले मीडियाचे कर्मचारी, लॉजिस्टिक मॅनेजर यांनाही या रकमेतील वाटा मिळेल. खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला या रकमेविषयी सांगण्यात आले आहे.
जय शहा यांनीही याआधीच सांगितले होते की, या बक्षिसाच्या रकमेत खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य अशा सगळ्यांचा समावेश असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ११ कोटी रुपये या संघासाठी जाहीर केले आहेत.