सोमवारी विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांचे लोकसभेत भाषण झाले. या भाषणाचा समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्याशिवाय, भाजपाच्या किंवा एनडीएच्या खासदारांनीही त्याचा खरपूस समाचार घेतला.
भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींना लक्ष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेसच्या काही लोकांनी विषारी विचार व्यक्त केले. सॅम पित्रोडा यांनी अशी विधाने केली होती. राहुल गांधी यांना पित्रोडा यांचे विधान मान्य आहे का, मग त्यांना पुन्हा पक्षात का घेतले गेले. राहुल गांधी यांना जबाबदारी घ्यावी लागेल. वर्णद्वेषी टिप्पणीची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही पित्रोडांच्या या टिप्पणीला स्वीकारू शकत नाही. बाकीच्यांनाही ती विचारसरणी मान्य आहे का?
अनुराग ठाकूर म्हणाले की, ज्यांची इच्छा होती त्यांना ९९ जागांवरच समाधान मानावे लागले. दिल के अरमा आसूओ मे बह गए. तिसऱ्यांदा विरोधी पक्षातच बसावे लागले. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते बनले मी त्यांचे अभिनंदन करतो. याआधी ते कोणतीही जबाबदारी न स्वीकारता अधिकारांचा लाभ घेत होते. आता जबाबदारीही घ्यावी लागेल. तिसरी टर्म मोदींची अग्निपरीक्षा नाही तर राहुल गांधींची आहे. विरोधी पक्षांना ते एकत्र ठेवतील का, याआधी लोकसभेत ५० टक्के त्यांची हजेरी असे ते संपूर्ण वेळ बसू शकतील?
लल्लनसिंह राहुल गांधींवर भडकले
जनता दल युनायटेडचे खासदार लल्लन सिंह यांनी बिहारी शैलीत राहुल गांधी तसेच काँग्रेसवर प्रहार केला. ते म्हणाले की, संविधानाचे पुस्तक घेऊन काँग्रेसचे सदस्य लोकसभेत आले होते. ज्या पक्षाने संविधानाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली त्यांना तो अधिकार तरी आहे का संविधानाबद्दल बोलण्याचा. सगळ्या कारकीर्दीत काँग्रेसने संविधानिक संस्थांच संपुष्टात आणल्या. सत्य ऐकण्याची सवय लावा. देशाच्या इतिहासात आणीबाणी हा काळा अध्याय म्हणून लिहिला जाईल. त्या काळात करुणानिधी यांच्या पक्षातील लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते, पण आज त्याच डीएमकेचे लोक काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे त्यानी संविधानाची प्रत सोबत जरूर ठेवावी, पण ज्यांनी संविधान उद्ध्वस्त केले त्यांच्यासोबत राहू नका.
त्याचवेळी जदयूबद्दल बोला अशी मागणी कुणीतरी केली तेव्हा लल्लनसिंह म्हणाले की, मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहे. तुमचा नेता (राहुल गांधी) तर राजकीय भाषण करत होता. असे वाटत होते की, तो नेता प्रचारसभेतच बोलत आहे.
निवडणूक प्रचारात यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रचार करत राहिले की, देशात निवडणूक निष्पक्ष पद्धतीने होत नाही. सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली. इव्हीएम मशिनला आव्हान दिले. पण इव्हीएम खोटे आहे तर हिमाचल, पश्चिम बंगालमध्ये कर्नाटकात, तेलंगणात आपले सरकार कसे काय स्थापन झाले. म्हणजे जेव्हा जिंकता तेव्हा इव्हीएमवर विश्वास आणि हरले की ईव्हीएमच्या नावाने शंख करायचा.
संबित पात्रा यांनी त्रिशूळाचे महत्त्व राहुल गांधींना समजावले
भाजपाचे प्रवक्ते आणि प्रथमच लोकसभेत निवडून गेलेले खासदार संबित पात्रा यांनीही राहुल गांधींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, हिंदू धर्म पर हिंदू धर्म को मानने वाले, हिंदू कहते है वो हिंसक है हे राहुल गांधीनी म्हटले ते अनुचित होते.मी हिंदू आहे याचा मला गर्व आहे आणि मी हिंसक नाही. राहुल गांधी त्रिशुळाविषयी बोलले की, महादेवांकडे त्रिशूळ आहे तो हिंसेसाठी नाही. पण तसे नाही. आमचे सगळे देवीदेवता हे एका हातात शास्त्र ठेवतात तर दुसऱ्या हातात शस्त्र. जर शास्त्रानुसार तुम्ही वागला नाहीत तर शस्त्राच्या सहाय्याने दंड देण्याची व्यवस्था अनादिकाळापासून आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी यांची निवड झाली याचा आनंद आहे, पण दोनवेळा आनंद आहे. आपण एक नाही दोन आहोत असे राहुल गांधी म्हणाले होते. एका राहुल गांधींपासूनच देशाला इतका लाभ झाला, तर दोन राहुलमुळे किती लाभ होईल याचा विचार करा. ते आनंदी आहेत की, आमचे ४०० पार का झाले नाहीत. तीन दशकांपासून समुद्रात पडलेले लोक आमच्या जहाजाला भोक कधी पडेल आणि ते बुडेल, याची वाट पाहात आहेत. ते पोहण्याचा प्रयत्न करत नाहीत.